खासगी हॉस्पिटल चालकांना जिल्हाधिकाऱयांनी दिले आदेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी खासगी हॉस्पिटल चालक व डॉक्टरांची तातडीने शनिवारी बैठक घेतली. कोविड रुग्णांसाठी 50 टक्के बेड राखीव ठेवावेत, अशी सक्त ताकीद त्यांनी केली आहे. याचबरोबर सरकारच्या निर्धारीत दराप्रमाणेच रुग्णांकडून रक्कम घ्यावी, अशी सूचनादेखील केली आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बैठकीत ही सूचना केली आहे. आयुषमान भारत, आरोग्य कर्नाटक, आरोग्य सुरक्षा आणि केपीएमई ऍक्ट अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व खासगी हॉस्पिटल्सनी मोफत उपचार करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, प्रवेश देताना त्यांच्याकडून अवाढव्य रक्कम घेणे किंवा बेड नाहीत, असे सांगणे योग्य नाही. कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर तातडीने दाखल करून योग्यप्रकारे उपचार करावेत. जिल्हय़ामध्ये ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या हॉस्पिटलला ऑक्सिजन हवे, त्यांनी वेळेत जिल्हा व्यवस्थापन समितीला माहिती द्यावी, असेदेखील सांगण्यात आले.
कोरोनाबाबत रुग्णांमध्ये भीती घालणे चुकीचे आहे. ओमिक्रॉन हा आजार सहज बरा होवू शकतो. तेव्हा रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती निर्माण करू नये. औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. सरकारी यंत्रणेकडे तसेच खासगी मेडीकल शॉप तसेच इतर ठिकाणी औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. तेव्हा योग्यप्रकारे उपचार करणे गरजेचे आहे.
जिल्हय़ात ऑक्सिजनची कमतरता नाही
जिल्हय़ामध्ये ऑक्सिजन, औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोविडच्या आपत्कालीन उपचारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. ऑक्सिजन पुरवठा, बेडची सुविधा, रुग्णवाहिकेची व्यवस्था यावर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. नोडल अधिकारी खासगी हॉस्पिटल्सवर नजर ठेवून आहेत. जर कोणत्याही हॉस्पिटलने निर्धारीत दरापेक्षा अधिक रक्कम आकारल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुलांच्या उपचारासाठी विशेष काळजी
मुलांवर उपचारांसाठी विशेष काळजी घेतली गेली आहे. सोयीनुसार बेडची व्यवस्था केली आहे. बालरोगतज्ञ डॉक्टरांनी मुलांवर उपचार करण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही मुलावर उपचार करण्यास कोणीही नकार देऊ नका, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. खासगी बालरुग्ण हॉस्पिटलमध्येदेखील सर्व सोय ठेवा. कारण मुलांना स्वतंत्रपणेच ठेवून त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. तेव्हा त्याकडेही अधिक लक्ष द्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी सर्व तयारी केली असल्याची माहिती दिली आहे. तिसऱया लाटेचा सामना करण्यास आरोग्य खाते सज्ज झाले आहे. खासगी डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार तसेच खासगी हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.