वृत्तसंस्था/ सिडनी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांना कोरोनाची बाधा झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सोमवारी ही घोषणा केली असून हॉकले यांनी यापूर्वी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या होत्या.
हॉकले यांची पीसीआर चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाची लक्षणे तीव्र नसल्याने त्यांना सध्या त्यांच्या निवासस्थानी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या ऍशेस मालिका चालू असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंशी संपर्क झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड तसेच ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याने ते आयासोलेशनमध्ये आहेत.