क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गुडशेड रोडवरील क्रीडाभारती कार्यालयाच्या सभागृहात क्रीडाभारती बेळगावतर्फे घेण्यात आलेल्या पदाधिकाऱयांच्या बैठकीत येत्या 11 व 12 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा संत मीरा व जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे विभाग कार्यवाह कृष्णानंदजी कामत व क्रीडाभारती राज्य सचिव ए. बी. शिंत्रे उपस्थित होते. प्रारंभी क्रीडाभारती राज्य अध्यक्ष मुकुंद किल्लेकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले, यानंतर ए. बी. शिंत्रे व विश्वास पवार यांनी क्रीडाभारती पदाधिकाऱयांच्या बैठकीत घेण्यात येणाऱया अनेक उपक्रमांची माहिती दिली.
तसेच जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्रामुख्याने भारतीय खेळाचा समावेश असणार आहे. महिलांसाठी तसेच शालेय प्राथमिक व माध्यमिक मुलीसाठी गजगे हा खेळ, प्राथमिक व माध्यमिक मुलांसाठी खुला गट भोगरा, प्राथमिक व माध्यमिक मुले व मुलीसाठी पोत्यात पाय घालून पळणे, प्राथमिक व माध्यमिक मुले व मुलीसाठी तीन पायांची शर्यत घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा अनगोळमधील संत मीरा इंग्रजी शाळेच्या मैदानावर होणार आहे. तसेच खुला गट व माध्यमिक मुले व मुली कब्बडी, थ्रोबॉल व माध्यमिक मुलें व मुलींसाठी खो-खो, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल तसेच प्राथमिक मुला-मुलींनासाठी व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे. इच्छुक संघानी आपली नावे विश्वास पवार, उमेश बेळगुंदकर व एन एन कातकर यांच्याकडे बुधवारी 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदवावित, असे आवाहन बेळगांव जिल्हा क्रीडाभारती संयोजक विश्वास पवार, मुकुंद किल्लेकर यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख गुरूदत्त कुलकर्णी, मोहन पत्तार, व्हीएस पाटील, सी. आर. पाटील, उमेश बेळगुंदकर, संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.