संशोधकांचा दावा : कोरोना विषाणूचे संक्रमण तुलनेत पुरुषांसाठी अधिक घातक : व्यसनांपासून दूर राहण्याचाही लाभ
कोरोना विषाणूचे संक्रमण महिलांच्या तुलनेत पुरुषांसाठी अधिक घातक ठरत आहे. प्राथमिक स्तरावर यामागील कारण मेल हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनच असल्याचे समोर आले होते. परंतु आता यासंबंधी आणखी नवी माहिती प्राप्त झाली आहे. क्रोमोसोम, एसीई-2 प्रोटीन आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित काही विशेष हालचालींचा यात समावेश आहे.
एसीई-2 रिसेप्टर्स
कोरोना विषाणूचे संक्रमण आणि त्याच्या मानवी शरीरावरील प्रभावाच्या दिशेने संशोधन करणाऱया विविध पथकांच्या वैज्ञानिकांनी पुरुषांच्या शरीरात महिलांच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रमण फैलावण्यामागील अनेक कारणांचा शोध लावला आहे. यातीलच एक प्रमुख कारण आहे एसीई-2 रिसेप्टर्स. हे रिसेप्टर्स विशेष प्रकारचे प्रोटीन असतात. या प्रोटीनला नियंत्रणात घेतल्यावर कोरोना विषाणू वेगाने शरीरात फैलावतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात हे रिसेप्टर अधिक प्रमाणात असतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. मधूमेह किंवा हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये एसीई-2 रिसेप्टर्सचे प्रमाण अधिक असते. याच कारणामुळे कोरोनाची लागण हृदयविकार तसेच मधूमेहाच्या रुग्णांना अधिक प्रमाणात होत आहे.
क्रोमोसोमसंबंधी नवी माहिती
महिलांच्या शरीरात एक्सएक्स क्रोमोसोम आढळतात आणि पुरुषांच्या शरीरात एक्सवाय क्रोमोसोम आढळून येतात. हे क्रोमोसोम इम्युनिटीलाही प्रभावित करत असल्याचे कोरोनासंबंधी सुरु असलेल्या अध्ययनातून समोर आले आहे. कोरोना संसर्ग शरीरात फैलावण्यापासून रोखण्यात एक्सएक्स क्रोमोसोम अत्यंत वेगाने सक्रीय होतात. ते शरीराची रोगप्रतिकारकशक्ती क्रियाशील करण्यासह त्याला अधिक प्रभावी करण्यासही सहाय्यक असतात असे तज्ञांचे सांगणे आहे.
अन्य हालचाली
आजच्या काळातही महिलांमध्ये धूम्रपान, मद्यसेवन आणि आळशी राहणीमान यासारखे प्रकार फारच कमी आढळून येतात. तर याच्या उलट मोठय़ा संख्येत अशा प्रकारांसह पुरुष स्वतःचे जीवन जगत असतात. याचा धोकादायक प्रभाव त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर पडतो, जो सद्य कोरोनाकाळात अधिक दिसून येत आहे.
हॉर्मोन्सची भूमिका
टेस्टोस्टेरॉन हॉमोनची कमी असलेल्या पुरुषांना कोरोना संसर्गाचा विळखा अत्यंत जलदपणे बसतो. हेच हार्मोन शरीरात कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यावर संसर्गामुळे फुफ्फुस आणि शरीराच्या अन्य भागांमध्ये सूज येऊ देत नाहीत. शरीरात या हॉमोनची कमतरता असल्यास आमचे शरीर अँटीइन्फ्लायमेट्री रिस्पॉन्स देत नाही आणि कोरोना संसर्ग शरीरात वेगाने फैलावू लागतो. कोरोनापासून वाचण्यासाठी पुरुषांच्या शरीरात हे हॉर्मोन किमान 70 टक्के असावेत. महिलांच्या शरीरात 60 टक्के प्रमाणात असल्यावरही टेस्टोस्टेरॉन उत्तमप्रकारे काम करतो आणि कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करत असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.
लसीचे दोन डोस आवश्यक
कोरोनावर लस तयार झाल्यास केवळ एका डोसने काम भागणार नाही. लोकांना दोन डोसची गरज भासणार असून ही सर्वात मोठी समस्या आहे. वर्तमान काळात टेस्टिंग किट, पीपीई किट आणि अन्य आवश्यक साधनांची कमतरता आहे. अशा स्थितीत दोनवेळा लसीकरण कार्यक्रम राबविणे मोठे काम असेल. मानवी इतिहासातील हा सर्वात अवघड लसीकरण कार्यक्रम असणार असल्याचे उद्गार अमेरिकेच्या वँडरबिल्ट विद्यापीठाच्या आरोग्य धोरणाचे प्राध्यापक डॉ. केली मूर यांनी काढले आहेत. अमेरिकेत लस बाजारात आणण्यासाठी ऑपरेशन वार्प स्पीड सुरू आहे. यांतर्गत 6 फार्मास्युटिकल कंपन्यांना निधी पुरविण्यात आला आहे. यातील मॉडर्ना आणि फायजरची लस तिसऱया टप्प्यातील चाचणीला सामोरी जात आहे.
प्रेडिक्ट प्रोग्राम सुरू करणार
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यास कोविड-19 सारख्या महामारीची पूर्वीच ओळख पटविण्यासाठी पुन्हा एकदा ‘प्रेडिक्ट’ कार्यक्रम सुरू करणार असल्याची घोषणा डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी केली आहे. हा कार्यक्रम यापूर्वी 2005 मध्ये एच1एन1 फ्ल्यू विषाणूवेळी सादर करण्यात आला होता.
इस्रायल :
कर्मचारी संपावरइस्रायलमध्ये सरकारवर नाराज असलेल्या 400 प्रयोगशाळांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. देशात केवळ गंभीर रुग्ण, कर्करोग आणि हृदयविकाराच्या रुग्णांची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाची चाचणीही सुरू राहिल, परंतु यात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या लोकांनाच त्याची माहिती दिली जाणार आहे.
ब्राझील : 366 बळी
ब्राझीलमध्ये दिवसभरात कोरोना संसर्गामुळे 366 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 16 हजार 158 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या 38,62,311 वर पोहोचली आहे. देशात 1,20,896 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील साओ पाउलो प्रांतात सर्वाधिक संकट आहे. प्रांतात 8 लाखांहून अधिक रुग्ण असून 29 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.
100 डॉक्टरांचा मृत्यू
इंडोनेशियात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. देशातील डॉक्टरांच्या संघटनेनुसार रुग्णांवर उपचार करणाऱया 100 डॉक्टरांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णांसाठी आता जागा शिल्लक नसल्याचे अनेक रुग्णालयांनी जाहीर केले आहे. इंडोनेशियात दिवसभरात 2,858 नवे रुग्ण सापडले आहेत.
शाळा सुरू होणार
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविल्यावर हाँगकाँगमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. कोरोनाबाधितांचा घटता आलेख पाहता सरकारने शाळा सुरू करण्याची योजना आखली आहे. शाळा दोन टप्प्यांमध्ये सुरू केल्या जाणार आहेत. वर्गामध्ये विद्यार्थी समोरासमोर बसून शिक्षण ग्रहण करू शकतील.
चीन : 24 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
चीनमध्ये दिवसभरात 24 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशात केवळ 237 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 4 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. देशात आतापर्यंत 80 हजार 177 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. देशात 85 हजार 31 रुग्ण सापडले असून यातील 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.