महिला उतरल्या रस्त्यावर : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर / किणये
जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याच्यावतीने मच्छे येथे क्वॉरंटाईन विभागातील संशयित रुग्णांना आणण्यात येणार असल्याची हालचाल सुरु होती. त्याला विरोध करण्यासाठी सोमवारी मच्छेतील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या परिसरात ही क्वॉरंटाईन रुग्णांची व्यवस्था नको, त्यांची अन्य ठिकाणी सोय करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मच्छे येथील लक्ष्मीनगर जवळील निराधार आश्रय केंद्राच्या बाजूला असलेल्या हॉस्टेलमध्ये क्वॉरंटाईन विभागातील संशयितांना दाखल करण्यात येणार असल्याच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या याची माहिती स्थानिक नागरिकांना कळाली. क्वॉरंटाईनचे संशयित रुग्ण घेऊन आल्यास त्याला विरोध करण्यासाठी महिला एकवटल्या होत्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वजण भयभीत झाले आहेत. मच्छेतील हॉस्टेलमध्ये बेड आणून ठेवण्यात आले आहेत, अशी चर्चा सुरु आहे. आपल्या परिसरात कोरोनाचा धोका नको यासाठी आम्ही मच्छेत क्वॉरंटाईन संशयित रुग्णांना विरोध करीत आहोत, असे काही महिलांनी सांगितले. सोमवारी सायंकाळपर्यंत क्वॉरंटाईन संशयित रुग्णांना मच्छेत दाखल करण्यात आले नव्हते. मात्र मंगळवारी सकाळी दाखल करण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत