ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले गिरीश चौधरी यांची 5.73 कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ईडीकडून 25 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली होती. परंतु, आज ईडीने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
गिरीश चौधरी हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. ईडीने चौधरी यांना जुलै महिन्यात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. दरम्यान, चौधरी यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये लोणावळय़ातील बंगला आणि जळगावमधील मालमत्तेचा समावेश आहे. तसेच ईडीने या प्रकरणात एकनाथ खडसे यांचेही 86 लाख रुपयांचे बँक डिपॉझिट गोठवले आहे. ईडीने खडसे यांची जानेवारी आणि जुलै महिन्यांत दोन वेळा चौकशी केली होती.
खडसे यांनी जावयाला पुण्यातील भोसरी परिसरातील एमआयडीसीची सरकारी जमीन कमी दरात खरेदी करण्यात मदत केल्याचा आरोप आहे. चौधरींनी 3.75 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या या जमिनीची किंमत प्रत्यक्षात जास्त होती.