वार्ताहर /शिवोली
शिवोली मतदारसंघात इतर उमेदवार पैशांच्या बळावर निवडणुक लढवीत आहेत. लोकांना विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. पण आमच्या सोबत फिरणारे कार्यकर्ते स्वगुशीने माझ्या विजयासाठी आज प्रचारात भाग घेतला आहे, असे माजी मंत्री व भाजपाचे संभाव्य उमेदवार दयानंद मांदेकर यांनी ओशेल येथे सांगितले.
ओशेल या भागातून दयानंद मांद्रेकर यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत जि.पं. सदस्या सनीशा तोरसकर, निहारीका मांदेकर, भाजपा मंडळाध्यक्ष मोहन धारगळकर, सिंपल धारगळकर, मार्ना-शिवोलीचे माजी सरपंच दिगंबर आगरवाडेकर, पुष्पा हरमलकर व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
मी भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो आहे. शिवोली मतदारसंघातून भाजपाची तिकीट आपल्यालाच मिळेल याबाबत शंका नाही. संभाव्य उमेदवारांकडून निवडणुकीसाठी भरपूर पैशांचा वापर केला जातो. एक मंत्री स्वतः पाकीटातून घरोघरी पैसे वाटप करीत आहे. जर मतदार आपल्यासोबत आहे तर पैसे वाटण्याची गरज काय असा आगळीक टोला श्री. मांद्रेकर यांनी हाणला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थति होते.