विदेशात पळण्याची होती तयारी : विशेष पथकाची कारवाई
नवी दिल्ली
पंजाबमधील मोगाच्या आयुक्त कार्यालयावर खलिस्तानी झेंडा फडकविणाऱया दोन आरोपींना दिल्लीत अटक करण्यात आली आहे. दोघेही 16 दिवसांपासून फरार होते आणि विदेशात पळण्याची तयारी करत होते. परंतु तत्पूर्वीच विशेष पोलीस पथकाने त्यांना अटक केली आहे. मोगातील रौली गावचे रहिवासी जसपाल सिंग आणि इंद्रजीत सिंग अशी आरोपींची नावे आहेत. जसपाल हा या गुन्हय़ाचा सूत्रधार असून त्याचे वडिल पंजाब पोलीस दलात अधिकारी आहेत. आरोपींचे प्रतिबंधित संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने स्वातंत्र्यदिनी स्वतःच्या समर्थकांना खलिस्तानी झेंडा फडकविण्यासाठी चिथावले होते. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकविणाऱयाला 1.25 लाख डॉलर्स देण्याची घोषणा त्याने केली होती. सरकारी कार्यालयावर झेंडा फडकविणाऱयाला 2.5 हजार डॉलर्स देणार असल्याचेही त्याने म्हटले होते. यातूनच प्रभावित होत आरोपींनी खलिस्तानी झेंडा तयार करवून घेतला होता.
दोन्ही आरोपींनी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता आयुक्त कार्यालयात शिरकाव केला होता. आणखी एका साथीदाराला त्यांनी सोबत घेतले होते. तिघांनीही आयुक्त कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील तिरंगा उतरवून खलिस्तानी झेंडा फडकविला होता. आरोपींनी या घटनेची चित्रफित तयार करत ती प्रसारित केली होती.
दिल्लीत पलायन
हा प्रकार समोर आल्यावर तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील एका आरोपीला घटनेच्या तिसऱयाच दिवशी अटक करण्यात आली होती. परंतु जसपाल आणि त्याचा सहकारी इंद्रजीत दोघेही दिल्लीत पळाले होते. देशविरोधी कारवायांचे दोन आरोपी दिल्लीत लपल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. विशेष पथकाने छापा टाकून या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांचेही खलिस्तान जिंदा फोर्स या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.