प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुक्यातील सुरुर फाटा येथील वाई वेस्टर्न फुड मॉलजवळ खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहने आणि खवल्या मांजर हस्तगत केले. ही कारवाई वनविभागाने फिल्मी स्टाईलने केली. दिलीप बाबुराव मोहिते (वय 50 रा.पिंपोडे बु, ता. कोरेगाव), वसंत दिनकर सपकाळ (वय 50 रा. धावडी ता. वाई), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (वय 34 रा. बालेघर ता. वाई), प्रशांत भीमराव शिंदे (वय 44, रा. शिरगाव ता. वाई), अक्षय दिलीप मोहिते (वय 23 रा. पिपोड बु।। ता. कोरेगाव) यांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की शुक्रवार दि. 29 रोजी वन विभागाला खास खबऱयांकडून माहिती मिळाली होती. त्यावरुन वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे व वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथक सचिन डोंबाळे यांनी सुरूर फाटा ते वाई दरम्यानच्या रस्त्यावर सापळा हॉटेल वाई वेस्टर्न फूड मॉल जवळ सापळा रचण्यात आला. पाच शिकारी पकडण्यात आले आहेत तर एक जिवंत दुर्मिळ खवल्या मांजर या पाच जणांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. व्यतिरिक्त एक चार चाकी महेंद्रा झायलो व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयित हे विक्री करण्यासाठी जिवंत खवल्या मांजर दुचाकीवरून त्यांच्याकडे लपवून ठेवलेल्या जागेवरून घेऊन चार चाकी गाडीमध्ये घेऊन आले. ती चार चाकी गाडीत विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवल्या मांजर असलेली खात्री झाल्यावर तात्काळ झटपट करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दिलीप मोहिते, वसंत सपकाळ, भिकाजी सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, अक्षय मोहिते या पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्याकडून तस्करी करून विक्रीसाठी आणलेले दुर्मिळ खवल्या मांजर हस्तगत करण्यात आले आहे. तसेच एक चार चाकी महेंद्रा झायलो व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितांनी यापूर्वी असे अनेक कारनामे केले असल्याचे समजते. अधीक तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो तथा माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथक सचिन डोंबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वाई महेश झांझुर्णे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, वनरक्षक विजय भोसले, पो. कॉ. राजेश वीरकर, पो. कॉ. सुहास पवार, वाहन चालक दिनेश नेहरकर हे सहभागी होते. खवल्या मांजर ही एक दुर्मिळ सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत ह्या प्राण्याला वाघा एवढेच संरक्षण दिले गेले आहे. त्यानुसार सात वर्ष सक्त कारावास व 10 हजार रुपये दंड अशी तरतूद आहे. नागरिकांनी आपल्या आजू बाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असेल तर गुप्त माहिती नजीकच्या वनविभागास कळवावे माहीत देणाऱयाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.