प्रतिनिधी / कुडचडे
खांडीवाडा-कुडचडे येथे पश्चिम रेल्वेतर्फे डबल ट्रकिंगचे काम सुरु असताना बाग शिरफोड येथील लोकांना जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. पण तेथे जाण्यास कोणताच चांगला रस्ता नसल्याने खांडीवाडा शेतातून सदर रस्ता बांधण्यासाठी स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांनी प्रस्ताव मांडून त्याचे सोपस्कर पुर्ण करण्यात आले होते. पण येथील काही रहिवासी ज्याच्या जमिनी सदर रस्त्याच्या आखणीत येत असल्यामूळे त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यासाठी काल गुरुवारी दि. 25 रोजी आमदार नीलेश काब्राल यांनी उपस्थित राहून आक्षेप असलेल्या लोकांकडे चर्चा केली व सदर गुंता सोडविला आहे. त्यात ज्या लोकांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहे त्यांना कमीत कमी तीन हजाराच्या दराने पैसे मिळवून देणार असे आश्वासन आमदार काब्राल यांनी सदर लोकांना दिले आहे.
आज जो विकास होत आहे तो सर्वा साठी असून कोणालाच त्रास न होता तो पुर्ण व्हावा हे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण आमदारांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः या मुद्यावर लक्ष घालून हे काम करून घेणार आहे अशी माहिती नुकत्याच या प्रभागासाठी निवडून आलेल्या नगरसेविका रुचा वस्त यांनी दिली आहे.
सदर रस्ता बांधण्यावर कोणाचाच आक्षेप नव्हता पण काही ठिकाणी जी आखणी केली होती ती चुकीची होती त्यात आमदारांनी सदर अभियंतांना दुरुस्ती करण्यासाठी सांगितले असून त्यात ज्या लोकांच्या जमिनी जात आहेत, त्यांना तीन हजार रुपयाच्या दराने पैसे मिळवून देणार असल्याचे आमदारांनी सांगितल्याची माहिती येथील जमीनदार वरुण कुडचडकर यांनी दिली आहे