मृतदेहाची ओळख पटली, मृत युवक बीड जिल्हय़ातील
प्रतिनिधी/ सातारा
चार दिवसांपूर्वी साताऱयानजिक राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीनजिक दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत असलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने तो युवक नेमका कोण? याचा शोध घेतला असून मृत युवक बीड जिल्हय़ातील असून त्याचे नाव अमोल डोंगरे असल्याचे समोर आलेय. त्याचा खूनच झाला असून पोलीस मारेकऱयांचा शोध घेत आहेत.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीनजिक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या 28 वर्षीय युवकाचा मृतदेह अमोल डोंगरे (मूळ रा. बीड जिल्हा) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. अमोल डोंगरे बेपत्ता असल्याबाबत सिंहगड, पुणे पोलिस ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत खिंडवाडीतील दगडाच्या खाणीमध्ये साठलेल्या पाण्यात चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खाणीतील पाण्यातून मृतदेह वर काढला. त्याच्या हातावर राणी असे गोंदलेले होते. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी जंगजंग पछाडले मात्र त्यात अपयश होते.
अखेर मंगळवारी रात्री माहिती समोर येत गेली आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पोलिसांनी वेगाने तपास केला. मृताची ओळख पटली असून त्याचे मारेकरी देखील समोर आले आहेत. दरम्यान, लवकरच पोलिस याबाबतची माहिती देणार आहेत.