मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पंतप्रधानांकडे मागणी : लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची दिली माहिती : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील खाण व पर्यटन उद्योग सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गोव्यातील एकंदरीत माहिती त्यांना थोडक्यात सांगितली. गोव्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खाण, पर्यटन सुरू होण्याची गरज आहे. हे दोन्ही उद्योग सुरू झाले तरच गोवा आर्थिक दृष्टीने सक्षम होईल, असे डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले.
गोव्याला आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे
राज्याची आर्थिक गाडी पुन्हा रूळावर यावी म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी केंद्राने आर्थिक मदत आणि पॅकेज द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. गोव्यातील लॉकडाऊनमध्ये मोठय़ा प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून सर्व व्यावहार बऱयाच प्रमाणात सुरळीत सुरू झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे बोलताना व्यक्त केला.
मार्गदर्शक तत्वांमधून आणखी शिथिलता मिळावी
गोव्यात सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरू झालेली नाही. आतंरराज्य बस वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका लोकांना बसत असून त्यांची गैरसोय होत आहे. राज्यात लॉकडाऊनचे पालन करण्यात येत आहे, तथापि काही बंधने, नियम-अटी कायम असल्यामुळे पूर्ण क्षमतेने आर्थिक व्यावहार तसेच जनजीवन सुरू करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे केंद्राने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वातून आणखी शिथिलता मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांना केली.
पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमावेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परिमल रॉय, पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग उपस्थित होते.
नवी मागदर्शक तत्वे जाहीर करणार
गोव्यात येणाऱया प्रत्येकाची कोविड 19 तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह असल्यास प्रवेश देण्यात येतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. अशी तपासणी करणारे गोवा हे एकमेव राज्य असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. लॉकडाऊन सुरू राहणार असले तरी काही व्यावहार सुरू करण्यासाठी केंद्राने राज्यांना अधिकार दिले आहेत. त्यानुसार राज्याने लॉकडाऊनच्या अटी-नियम ठरवायच्या आहेत. 17 मेनंतर गोव्यातही लॉकडाऊन पुढे चालूच राहणार असून त्याची मार्गदर्शक तत्वे 18 मे पुर्वी जनतेसाठी जाहीर करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
येत्या 18 मे नंतरही लॉकडाऊन – सीमा बंदी चालूच
पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, गोव्यातील लॉकडाऊन 18 मेपासून पुढे चालूच राहणार असून केंद्र सरकार ठरवेल तेव्हाच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. गोव्याच्या सीमा प्रवासी वाहतुकीसाठी बंदच ठेवल्या जाणार असून फक्त अत्यावश्यक वस्तू वाहनांनाच पास काढून गोव्यात येण्यास परवानगी देण्यात येणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र या दोन्ही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सीमा खुल्या करणे सध्या तरी शक्य नाही. त्या तशाच बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
दहावी-बारावी परीक्षा ठरल्याप्रमाणेच होणार
दहावी-बारावी परीक्षांचे राजकारण कोणीही करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. गोवा बोर्ड व शिक्षण खाते यांनी पुर्णपणे विचार करून परीक्षा निश्चत केल्या आहेत. त्यात कोणताही बदल आता होणार नाही आणि त्या ठरल्याप्रमाणे घेण्यात येतील. त्याबाबत कोणी चुकीचे संदेश, मते प्रसारित करू नयेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होऊ शकते, असे ते म्हणाले.
511 प्रमोद सावंत 1 पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला आरोग्यमंत्री विश्वजित राणे.