केबीएफसी खानापूर उपविजेते, सुधीरला सर्वोत्तम खेळाडूचा तर ज्ञानेशला सर्वोत्तम गोलरक्षकाचा बहुमान
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर येथील उप्पीन ब्रदर्स आयोजित पहिल्या श्रीशैल उप्पीन स्मृती चषक निमंत्रितांच्या सिक्स ए साईड दिवस-रात्र फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डिसायडर खानापूर संघाने केबीएफसी खानापूर संघाचा टायब्ा्रsकरमध्ये 3-1 (4-2) असा पराभव करून चषक पटकाविला. डिसायडर संघाच्या सुधीरला उत्कृष्ट खेळाडू तर जनता गॅरेज संघाला उत्कृष्ट संघाचा बहुमान देण्यात आला.
खानापूर येथील मलप्रभा स्टेडियमवर आयोजित श्रीशैल उप्पीन चषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात केबीएफसी खानापूर संघाने हमजा एफसी गोवा संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात राहुल, रघु व अमिल बेपारी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसरा उपांत्य सामना डिसायडर वि. कोळेकर ब्रदर्स यांच्यात झाला. या सामन्यात डिसायडर संघाने कोळेकर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. डिसायडरतर्फे चिंटू याने एकमेव गोल करून विजय मिळवून दिला.
प्रदीप उप्पीन, श्रीधर, निखील, सतीश उप्पीन ब्रदर्स, चन्नवीराप्पा उप्पीन, वीरभद्र जवळी, उमेश जवळी आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून अंतिम सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. दोन्ही संघांनी पहिल्या मिनिटापासून आक्रमक चढाया करीत संधी निर्माण केल्या. पण त्या दवडल्यामुळे पहिल्या सत्रात गोलफरक कोराच राहिला. दुसऱया सत्रात 32 व्या मिनिटाला डिसायडरच्या राहुल पंतोजीच्या पासवर सुधीरने गोल नोंदवत आघाडी घेतली. खेळ संपण्यास काही मिनिटे असताना केबीएफसीच्या अमिल बेपारीच्या पासवर राहुल गुरवने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. बरोबरी झाल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये डिसायडर संघाने 4-2 असा विजय मिळवला. टायब्रेकरमध्ये डिसायडरतर्फे राहुल, चिंटू व सुधीर यांनी गोल केले तर केबीएफसीतर्फे रघुने गोल केला. प्रतीक खाडे व जोतिबा पाटील यांनी चेंडू बाहेर मारले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे जे. पी. शेट्टी, वीरभद्र जवळी, उमेश जवळी, मंदा कुंदरगी, अप्पय्या कडोळी, चंद्रकांत कडोळी, विनोद देसाई, प्रदीप, श्रीधर, निखील, सतीश, चन्नवीराप्पा, विशाल, सुनील हे सर्व उप्पीन ब्रदर्स यांच्या हस्ते विजेत्या डिसायडर संघाला 22 हजार रूपये, आकर्षक चषक तर उपविजेत्या केबीएफसी संघाला 15 हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू सुधीर (डिसायडर) उत्कृष्ट गोलरक्षक ध्यानी सावंत (केबीएफसी), उत्कृष्ट डिफेंडर साहिल (कोळेकर ब्रदर्स), उत्कृष्ट संघ जनता गॅरेज यांना चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत हुबळीचे पंच राजेश व जॉन यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा सचिव रवी सागर उप्पीन व त्यांच्या सहकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.