दुचाकीवरील दोघे जखमी : सुदैवाने अनर्थ टळला
वार्ताहर / खानापूर
खानापूर-हल्याळ राज्यमार्गावरील लालवाडीनजीक जुनाट वडाचे झाड बुंध्यातून तुटून पडल्याने रविवारी दुपारी या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.
या अपघातात दुचाकीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. यामध्ये जखमी झालेल्या दुचाकीधारकाचे नाव शशीधर सोनोळी (वय 70, रा. खानापूर) असे असून दुचाकीवरील अन्य एकजण जखमी झाला आहे. खानापूर-हल्याळ मार्गावर अनेक जुनाट झाडे आहेत. रविवारी दुपारी 12 च्या सुमारास लालवाडी व नावगा क्रॉसदरम्यान एक जुनाट झाड अचानकपणे बुंध्यातून तुटून पडले. सदर झाड जवळपास शंभर वर्षांपूर्वीचे असून बुंध्यातून कमकुवत झाले होते. रविवार खानापूरचा आठवडी बाजार असूनही दुपारी या मार्गावरील वर्दळ कमी होती. दरम्यान, शशीधर हे बिडी येथे आपल्या शेतातील काम आटोपून खानापूरला येत असताना अचानकपणे त्यांच्या अंगावर झाड कोसळले. यावेळी शशीधर व त्यांच्या समवेत असलेला त्यांचा मजूर या झाडाखाली अडकले. केवळ दैव बलवत्तर म्हणून झाडाखाली सापडूनही ते सहीसलामत राहिले. जवळ असलेले नागरिक व रस्त्यावरून जाणाऱया अन्य वाहनधारकांनी तातडीने झाडाखाली सापडलेल्या त्या दोघांना बाजूला केले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खानापूर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, नंदगड पोलीस स्थानकाला तसेच वनखात्याला याची माहिती मिळताच तातडीने रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांची बरीच गोची झाली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.