नवी दिल्ली : अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या मंदिराचे निर्मितीकार्य सुरू असून याकरता देशभरातून निधी जमविला जात आहे. भाजपचे खासदार तसेच माजी क्रिकेटपटू गौतम गंभर यांनीही यात स्वतःचे योगदान देत एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
गंभीर यांनी गुरुवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱयांची भेट घेत स्वतःचा सहकार्यनिधी प्रदान केला आहे. राम मंदिराचा ट्रस्ट आणि विहिंपकडून देशभरात निधी संकलनाची मोहीम सुरू आहे. यांतर्गत लाखो कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी गुरुवारीच राम मंदिर उभारणीसाठी 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. कोलकात्याच्या राजभवनात ट्रस्टच्या पदाधिकाऱयांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या मोहिमेच्या प्रारंभी ट्रस्टच्या पदाधिकाऱयांनी सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून देणगी मिळविली होती. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज व्यक्तिमत्वांनी आतापर्यंत यात स्वतःचे योगदान दिले आहे.