ऑनलाईन टीम / अमरावती :
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या घरातील 11 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले, एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते. मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच राहा-सुरक्षित राहा, शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन नवनीत राणा यांनी करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांच्या बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे, असेही म्हटले आहे. दरम्यान, रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही कोरोनाची लागण झाली आहे.