@ प्रतिनिधी/ बेळगाव
काडय़ापेटी मागितली म्हणून झालेल्या वादावादीनंतर ट्रक क्लिनरचा भीषण खून केल्याच्या आरोपावरून शहापूर पोलिसांनी एका जोडगोळीला अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
पवन रमेश कुडाल (वय 26, रा. मंगाईनगर, वडगाव), गगन अनंत उर्फ आनंद सनक्की (वय 25, रा. होसूर, बसवाण गल्ली) अशी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
मंगळवारी रात्री जुने बेळगाव जवळील शेतवडीत महम्मदसमीउल्ला (वय 41, रा. चित्रदुर्ग) या क्लिनरचा खून केला होता. बिअर बाटली व दगडाने हल्ला करून त्याचा खून केला होता. त्याच दिवशी राजू मल्लेशी लोकरे (वय 22, रा. मंगाईनगर, वडगाव) याला पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणातील आणखी दोघे संशयित फरारी झाले होते. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक एम. बी. कांबळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक उदय पाटील, एस. आर. दोड्डनायकर, एन. सी. तुरमंदी, एस. एम. कांबळे, ए. व्ही. निलप्पण्णावर आदींचा समावेश असलेल्या पथकाने या जोडगोळीला शुक्रवारी अटक केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले.