जप्त प्रॅडो कारचे मुळ मालक विजयकुमार भोसले खेडचे
प्रतिनिधी/ चिपळूण
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटके प्रकरणात निलंबित झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या प्रॅडो कारचे मूळ मालक मुंबईतील शिवसेनेचे नेते आणि खेडचे विजयकुमार भोसले असल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. भोसले यांच्या याच गाडीतून स्वतः वाझे हे मनसुख हिरेन यांना सीपी ऑफिसला घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले होते.
अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाच्या तपासादरम्यान एमएच 02 सी सी 101 क्रमांकाची प्रॅडो गाडी जप्त करण्यात आली आहे. तिची मालकी विजयकुमार भोसले यांच्याकडे होती. भोसले हे मुंबईतील चारकोप विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आहेत. मुळ खेड तालुक्यातील पंधरागांवमधील भोसले यांनी 2014मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते भास्कर जाधव यांनी भोसलेंचा पराभव केला होता. त्यावेळी जाधव यांना 72 हजार 525 मते मिळवून ते विजयी झाले, तर भोसले हे 32 हजार 83 मते मिळवत तिसऱया क्रमांकावर फेकले गेले. निवडणुकीनंतर भोसले हे निवडणूक वगळता जिल्हय़ात स्थानिक पातळीवर फारसे सक्रिय होत नव्हते.
दरम्यान, सध्या राज्यभर गाजत असलेल्या वाझे प्रकरणात जप्त केलेली कार ही भोसले यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अनेकाना धक्का बसला. विशेष म्हणजे काहीनी तर ही कार 2014 च्या निवडणूक प्रचारातही ते वापरत असल्याचे ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. भोसले हे शिवसेनेशी संबंधित असल्याने आणि त्यातच सध्याच्या प्रकरणात केंद्रबिंदू असलेल्या वाझे यांच्याकडे त्यांची कार सापडल्याने शिवसेनेची डोकेदुखी मात्र वाढत चालली आहे.