प्रतिनिधी /खेड :
बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार 13 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली असून यात येथील नगर परिषदेच्या 2 कर्मचाऱयांचाही समावेश आहे. शहरातील समर्थनगर येथील दोघांसह वेरळ, खोपीतील प्रत्येकी 1, घरडा कॉलनी, लेटे व आष्टीतील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. अन्य तिघेजण चिपळूण येथील रहिवाशी आहेत. शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे 5 जुलैपर्यंत नगर परिषद कार्यालय बंद राहणार असल्याचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 99 वर पोहचली असून 62 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरातील एकविरा नगरपाठोपाठ वाणीपेठ, कुंभारआळी, समर्थनगर येथे आढळलेल्या कोरोनाबाधितांमुळे नगर प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून सर्वेक्षणाची मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 7वर पोहचली असून नगर प्रशासनाने वाणीपेठ, कुंभारआळी, हनुमान पेठ, समर्थनगर, बाजारपेठेच्या काही भागात कन्टेनमेंट झोन जाहीर केला आहे.
14 जुलैपर्यंत या परिसरात प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने हादरलेल्या नगर प्रशासनाने खबरदारी म्हणून तातडीने जंतूनाशक फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 5 जुलैपर्यंत नगर परिषद कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. काही आवश्यकता असल्यास तातडीने नगराध्यक्ष वैभव खेडेकर व मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील व्यवस्थापकास कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्यातील आतापर्यंत 12 हून अधिकजणांना कोरोनाची लागण झाली आहे. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या कंपनीत जाणाऱया अधिकारी व कामगारांना बंदी घालणार असल्याचे नगराध्यक्ष खेडेकर यांनी स्पष्ट केले आहे.