प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील वरवली-धुपेवाडीत कोरोना रूग्ण वाढत असतानाच अन्य 3 गावांमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणेची धावाधाव सुरू आहे. शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार वावे येथील 4, भरणे 1 व आपेडेतील 2 अशा 7 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. नव्या रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 541 वर पोहोचली आहे.
तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच वरवली-धुपेवाडीत आढळलेल्या 27 रूग्णांमुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. आतापर्यंत तब्बल 163 जणांचे स्वॅब तपासण्यात आले असून त्यातील 43 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आंबवली न्यू. इंग्लिश स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व वरवली नं. 1 प्राथमिक शाळेतील प्रत्येकी एक अशा तीन विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने शाळा, महाविद्यालय अजूनही बंदच आहे. विद्यार्थ्यांच्या अहवालाकडे पालकांचे लक्ष लागले आहे. वरवलीतील चार वाडय़ांमध्ये 3 आरोग्य पथकांकडून घरोघरी सर्वेक्षण सुरूच आहे. वरवलीत कोरोनारुग्ण वाढत असतानाच किंजळेपाठोपाठ भरणे, वावे व आपेडे येथेही कोरोनाचे रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत नवी भर पडली आहे. तिन्ही ठिकाणी कन्टेनमेंट झोन जाहीर करण्याच्या हालचाली सुरू होत्या.