जि.प.सदस्य अरुण कदम यांचा इशारा, बदली होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रतिनिधी- खेड
प्रतिनिधी / खेड
लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार आहेत. त्यांची बदली होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार जि.प. सदस्य अरूण कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
निवडणूक काळात गुन्हेगारांना मोकाट सोडून माईंदरच्या आमदार यामिनी जाधव यांना मध्यरात्री २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पोलीस स्थानकात तिष्ठत ठेवून उद्धट उत्तरे देणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या ज्येष्ठ नागरिकांनाही अपमानित करत आहेत. पोलीस स्थानकात कोणत्याही प्रकारची शिस्त नसून अनेक बीट अंमलदार पोलीस स्थानक सोडून खासगी कामासाठी अन्यत्र फिरत असल्याचा आरोप केला आहे. नागरिक न्यायासाठी पोलीस स्थानकात येतात. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना चढ्या आवाजात बोलून घाबरवण्याचे काम होत असल्याने अनेक नागरिकांना न्याय मिळत नाही.
पोयनार, चिंचघर येथे तरूणांना मारहाण केल्यानंतर येथील पोलीस स्थानकाचे पोलीस कोणतीही तक्रार नसताना त्याठिकाणी पोलिसांची गाडी घेवून जातात. मारहाण झालेल्या व्यक्तीला उचलून माजी आमदारांच्या घरी घेवून जातात. त्याठिकाणी दमदाटी करून त्याला परस्पर कळंबणी रूग्णालयात दाखल करतात. आरोपी मोकाट फिरत असूनही त्यांना पकडण्यासाठी पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
पोयनारचे आरोपी फरार दाखवून ते पोलिसांसमोर मोकाटपणे फिरून पोलिसांसमोरच मतदानाचा हक्क बजावतात. तरीदेखील कारवाई होत नाही. याविरोधात तालुका शिवसेना पोलीस निरीक्षक पत्की व पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरणार असून, त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन छेडणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी एक दिवसाचे लाभगिक उपोषण करणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.