प्रतिनिधी / दांडेली
खोटय़ा नोटा प्रकरणी दांडेली ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी सहा जणांना अटक केली होती. त्यामधील बेळगावचे दोघे व रत्नागिरीच्या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. तर दांडेलीच्या शिवाजी कांबळे व शब्बीर अँथोनी कुट्टी या दोघांना पोलीस कोठडी दिली होती.
पोलिसांनी दांडेलीच्या दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता विजय जोसेफ वर्तन हा आम्हाला खोटय़ा नोटा आणून देत होता. शिवाय नंदगड (ता. खानापूर) येथील सर्फराज अबुतालीब हिरेकर (वय 28) व खुर्शीद महमद रफीक सकली हे दोघे या खोटय़ा नोटा प्रकरणात सामील असल्याची माहिती तपासात उघड झाल्याने पोलिसांनी या दोघांना गुरुवारी अटक केली आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गणेशनगर दांडेली येथील या प्रकरणातील प्रमुख आरोपी विजय जोसेफ वर्तन हा अद्याप फरारी आहे. त्याच्या घरावर धाड टाकली असता इप्सन कलर्स प्रिंटर्स, लॅपटॉप आणि काही उच्च किमतीचे पेपर जप्त केले आहेत.
विजयला पकडण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कारवार जिल्हय़ाचे एसपी श्री शिवप्रसाद देवराज यांच्या आदेशावरून ही माहिती दांडेली ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.