बेळगाव : नववर्षाच्या प्रारंभी व शनिवारच्या दिवशी सकाळी कोळीकोप्प येथे विजेचा धक्का लागून विद्युतखांबावरून जमिनीवर पडल्यानंतर भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. नंतर ते जखमी माकड जवळच असलेल्या डबक्यात पडले. हे सर्व तेथील काही गावकरी व युवकांनी पाहिले आणि त्याला कुत्र्यांपासून व पाण्यातून बाहेर काढून तात्काळ अभियंते हणमंत कुगजी यांना ही वार्ता कळविली. थोडाही विलंब न करता कुगजी यांनी कोळीकोप्प येथे धाव घेतली व आपल्या गाडीतून त्या जखमी माकडाला बेळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. पण दुपारची वेळ असल्याकारणाने तेथे कोणीही डॉक्टर नव्हते. पुन्हा कुगजी यांनी फोनवरून विचारले असता त्यांना काकती येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध आहेत, अशी माहिती मिळाली. लागलीच तेथे जाऊन त्यांच्यावर प्रथमोपचार करून तेथील डॉ. चंद्रकांत यांनी पुन्हा बेळगाव येथेच पुढील उपचारासाठी पाठविले. तेथे डॉ. विवेक मल्लापुरे यांनी सर्व उपचार करून त्या जखमी माकडाला भुतरामट्टी येथील चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुगजी यांनी तेथे नेऊन डॉक्टरच्या स्वाधीन केले. यावेळी कोळीकोप्प येथील युवक अनिल दंडकर, तसेच आशादीपचे परशराम खेमनाकार यांचीही मदत झाली व नागरिकांतून शनिवारच्या दिवशी जखमी झालेल्या माकडाला जीवदान मिळाल्याने समाधान वाटले.
Previous Articleभू-संपादन लवादाची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांवर सोपवा
Next Article सांबरा महामार्गावर चुकीच्या पद्धतीचा गतिरोधक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.