वार्ताहर/साळवण
स्वातंत्र्यदिन असो वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण हे रुढ पद्धतीनुसार संबंधीत गावचे सरपंच किंवा स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते केले जाते. मात्र, गगनबावडा तालुक्यातील असंडोली पैकी शिंदेवाडी प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण भारतीय सीमा सुरक्षा दलातील शहिद जवान सना आलम मुल्ला यांच्या मातोश्री शबाना मुल्ला यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक लौकीक खेडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सांगली जिल्हयातील पलुस तालुक्यामधील आंधळी गावच्या कन्या असणाऱ्या शहिद सना आलम मुल्ला भारतीय सीमा सुरक्षा दलात सेवेत कार्यरत असताना शहिद झाल्या होत्या. शहिद जवानांच्या नातेवाईकांच्या हस्ते ध्वजारोहन करुन नागरिकांमध्ये सैनिकाविषयी असणारी प्रेमाची, सन्मानाची भावना वृध्दीगत व्हावी, सामाजिक बांधिलकी जपून विद्यार्थ्याच्या मध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवेची भावना वाढीस लागावी यासाठी या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविन्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. शाळेच्या या निर्णयांचे समाजातून कौतुक होत आहे.
बीएसफ जवान सना मुल्ला यांच्या मातोश्री शबाना मुल्ला यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या ध्वजारोहन समारंभास असंडोलीचे सरपंच यूवराज पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षासह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.