प्रतिनिधी / बेळगाव
आपली दुचाकी उभी करताना गटारीत पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी दत्त गल्ली-वडगाव येथे ही घटना उघडकीस आली असून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मंजुनाथ शशिकांत गडद (वय 32, रा. चावडी गल्ली-वडगाव) असे त्याचे नाव आहे. मंजुनाथ हा कॉम्प्युटर सेल्स व सर्व्हिसचे काम करीत होता. बुधवारी मध्यरात्री 2 ते गुरुवारी सकाळी 6.45 यावेळेत ही घटना घडली आहे. मंजुनाथचे वडील शशिकांत गडद यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुनाथ कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असायचा. आपली दुचाकी उभी करून खाली उतरताना तोल जाऊन गटारीत पडल्यामुळे त्याच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ माजली होती. गटारीतील युवकाच्या मृतदेहाची सुरुवातीला ओळख पटली नव्हती. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.