61 चेंडूत नाबाद 106 धावांचा झंझावात, पंजाबचे दिल्लीला 165 धावांचे आव्हान, मोहम्मद शमीचे 28 धावात 2 बळी
वृत्तसंस्था/ दुबई
आयपीएलमध्ये 5 हजार धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत दाखल होत शिखर धवनने आयपीएल इतिहासात प्रथमच सलग दोन सामन्यात सलग शतके झळकावण्याचा विक्रमही थाटात आपल्या खात्यावर नोंदवला. त्याच्या शतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध निर्धारित 20 षटकात 5 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. अवघ्या 61 चेंडूत 106 धावांची झंझावाती खेळी साकारणाऱया शिखर धवनने 12 चौकार व 3 षटकार फटकावले. येथे 57 चेंडूतच त्याने साजरे केले.
चौफेर फटकेबाजी
या आयपीएल हंगामात विशेष बहरात आलेल्या शिखर धवनने पंजाबच्या हरएक गोलंदाजाचा उत्तम समाचार घेतला आणि चौफेर फटकेबाजी केली. आयपीएल इतिहासात लागोपाठ दोन शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. डावातील 19 व्या षटकात थर्डमॅनकडे चेंडू फटकावत दुहेरी धावा झळकावत त्याने शतकाला गवसणी घातली.
5 हजार धावाही सर
तत्पूर्वी, या दिग्गज डावखुऱया फलंदाजाने 5 हजार धावांचा टप्पाही सर केला. 62 धावांवर असताना त्याने या माईलस्टोनचा कब्जा केला. त्याने 169 सामन्यात हा पराक्रम साकारला. आयपीएलमध्ये 5 हजार धावा जमवणाऱया 5 फलंदाजांमध्ये धवन हा चौथा भारतीय आहे. असा पराक्रम करणाऱया फलंदाजांमध्ये डेव्हिड वॉर्नर (135 सामन्यात 5 हजार), विराट कोहली (186 सामन्यात 5759), सुरेश रैना (183 सामन्यात 5468) व रोहित शर्मा (196 सामन्यात 5149) यांचा समावेश आहे.
डावखुऱया धवनने डावातील 13 व्या षटकात रवी बिश्नोईच्या गोलदांजीवर खणखणीत षटकार वसूल केला आणि याचवेळी 5 हजार धावांचा टप्पा सर केला.
शमीचा भेदक मारा
पंजाबतर्फे जलद-मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीने 28 धावात 2 बळी घेतले. धवनने यापूर्वी या हंगामातील मागील लढतीत चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध देखील धमाकेदार शतक झळकावले होते. त्याच्या शतकामुळे दिल्लीला सहज विजय संपादन करता आला होता.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. मॅक्सवेल, गो. नीशम 7 (11 चेंडूत 1 चौकार), शिखर धवन नाबाद 106 (61 चेंडूत 12 चौकार, 3 षटकार), श्रेयस अय्यर झे. राहुल, गो. अश्विन 14 (12 चेंडूत 1 चौकार), ऋषभ पंत झे. अगरवाल, गो. मॅक्सवेल 14 (20 चेंडूत 1 चौकार), स्टोईनिस झे. अगरवाल, गो. शमी 9 (10 चेंडू), हेतमेयर त्रि. गो. शमी 10 (6 चेंडूत 1 षटकार). अवांतर 4. एकूण 20 षटकात 5 बाद 164.
गडी बाद होण्याचा क्रम
1-25 (पृथ्वी शॉ, 3.2), 2-73 (श्रेयस अय्यर, 8.3), 3-106 (पंत, 13.4), 4-141 (स्टोईनिस, 17.3), 5-164 (हेतमेयर, 19.6).
गोलंदाजी
मॅक्सवेल 4-0-31-1, मोहम्मद शमी 4-0-28-2, अर्शदीप सिंग 3-0-30-0, जेम्स नीशम 2-0-17-1, मुरुगन अश्विन 4-0-33-1, रवी बिश्नोई 3-0-24-0.