चिपळूणच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील प्रताप,
प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूण नगर परिषदेने मंगळवारी शहरातील भोगाळे, बसस्थानक परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. मात्र कारवाई करताना गरिबांचे साहित्य जप्त केले मात्र बडय़ांचे साहित्य रस्त्यावरच ठेवत दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त गरीब व्यावसायिकांनी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. काही लोकप्रतिनिधींचीही भेट घेतली.
गेल्या काही वर्षांपासून शहराला अतिक्रमणाचा शाप आहे. मात्र नगर परिषद अशा व्यावसायिकांवर ठोस कारवाई करीत नसल्याने ते सातत्याने वाढतच आहे. सध्या अनेक भागांमध्ये इतके अतिक्रमण वाढले आहे की, त्या भागातून वाहने चालवणे सोडाच; साधे चालणेही कठीण बनले आहे. असे असताना नगर परिषद प्रशासन हाताची घडी घालून बसले आहे. अधूनमधून केवळ किरकोळ कारवाई करण्याचे ढोंग केले जात आहे.
मंगळवारची अशाच प्रकारची दिखाऊ कारवाई मात्र वादग्रस्त ठरली आहे. चिंचनाक्यापासून सुरू झालेल्या कारवाईत केवळ गरिबांचे साहित्य ताब्यात घेऊन गाडीत भरण्यात आले. मात्र भोगाळे येथील रस्त्यावरच सुरू असलेल्या गादी कारखान्यासह लगतच्या कोणत्याही दुकानदारांवर कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे कारवाई सुरू असताना त्यांनी रस्त्यावर मांडलेल्या वस्तूही मागे घेण्याची तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे चिडलेल्या अन्य व्यावसायिकांनी थेट नगर परिषद गाठून आमच्याकडून पावती फाडून पैसे घेता, मग कारवाई का करता, आमच्यावर कारवाई, अन्य लोकांवर वरदहस्त कसा, असा संतप्त सवाल काही अधिकाऱयांना विचारला. मात्र त्याचे उत्तर कोणीही दिले नाही.
कारवाईत भेदभाव करू देणार नाहीः शिंदे
या व्यावसायिकांनी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांची भेट घेऊन कारवाईत दुजाभाव कसा केला जातो, याचे कथन केले. यावेळी शिंदे यांना अगोदरच कोरोनामुळे तुम्ही अडचणीत आहात. त्यामुळे सध्यातरी प्रशासनाने अशी कारवाई करणे चुकीचे वाटते. तरीही तुम्ही सर्वांनी अर्ज करून अधिकृत परवाना घ्या, तुमची कोठे, कशी व्यवस्था करायची हे आम्ही ठरवू. मात्र कारवाईत भेदभाव करू देणार नाही. कारवाई झाल्यास सरसकट करा, असे प्रशासनाला सांगण्याचे आश्वासन दिले.