अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतील ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएम व जपानच्या नाओमी ओसाका यांचे विजेतेपद म्हणजे नव्या थिमचाच उदय म्हणावा लागेल. मागची काही वर्षे टेनिस विश्व हे प्रामुख्याने रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच अशा खेळाडूंभोवती फिरत राहिले आहे. 2004 ते 2019 अशी तब्बल 16 वर्षे यूएस ओपनची अंतिम फेरी या त्रिदेवांमध्ये रंगणे, यातूनच त्यांचे वर्चस्व ध्यानी येते. हे पाहता प्राप्त परिस्थितीत मारलेली मुसंडी ही एका स्थित्यंतराचीच नांदी म्हणता येईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर पार पडलेली ही स्पर्धा सर्वार्थाने वेगळी म्हटली पाहिजे. कोरोना प्रादुर्भावामुळे पुरुष एकेरीत झंझावाती नदालने माघार घेतली, तर नजाकतीचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱया फेडररने दुखापतीमुळे स्पर्धेतून अंग काढून घेतले. त्यामुळे सर्व आशा नोवाक जोकोविचवर केंद्रीत असताना त्याने रागाच्या भरात मारलेला चेंडू महिला अधिकाऱयास (लाईन जज्ज) लागल्याने त्याला स्पर्धेतून बाद ठरविण्यात आले. त्यामुळे यंदा नवा विजेता मिळणार, हे निश्चित होते. त्यात दुर्दम्य इच्छाशक्ती व मोक्याच्या क्षणी खेळ उंचावल्यामुळे थिएमने बाजी मारली, असे दिसून येते. फायनलमध्ये हे तीन दिग्गज नसले, तरी जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने केलेला तोडीस तोड खेळ पाहता त्याच्या विजयाचे मोल कमी होत नाही. वास्तविक झ्वेरेवने दोन सेट जिंकून आणि तिसऱया सेटमध्येही आघाडी घेऊन त्याच्या स्वप्नांना जवळपास सुरूंग लावला होता. परंतु, सर्व्हिस भेदून थाटात पुनरागमन कसे करता येते, याची ‘थिम’च गुणवान डॉमिनिकने दाखवून दिली आहे. मागील 71 वर्षांत फायनलमध्ये दोन सेट गमावून जेतेपद पटकावणारा थिएम हा पहिला खेळाडू ठरतो, यावरूनच त्याच्या या कामगिरीचे मूल्य लक्षात येईल. अफाट जिद्द नि शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती ठायी असली, की सामन्याचे चित्र कधीही पालटवता येते, याचाच हा वस्तूपाठ होय. मुख्य म्हणजे थिएमचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. या आधी 2018 व 19 च्या प्रेंच ओपन व 2020 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. परंतु, अंतिम फेरीत खेळल्याचा अनुभवही त्याच्या कामी आला, असे निश्चितपणे म्हणता येईल. अर्थात झ्वेरेवनेही नाउमेद होण्याचे कारण नाही. त्याने दिलेली टक्कर पाहता त्याच्याकडूनही भविष्यात निश्चित आशा असतील. मागच्या 14 ते 16 वर्षांच्या विंबल्डन, प्रेंच, ऑस्टेलियन व अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या निकालांवर नजर टाकल्यास फेडरर, नदाल, जोकोविच या तीन दिग्गजांसह अँडी मरे, स्टेन वावरिंका हीच काय ती नावे दिसतात. यात फेडररची 20, नदालची 19, तर जोकोविचची 17 अशी तिघांची मिळून तब्बल 56 ग्रँड स्लॅम पदके आहेत. हे पाहता या स्पर्धेतून नवा विजेता गवसला, असे नक्कीच म्हणता येते. किंबहुना थिएमने आपली गुणवत्ता दाखवून दिली असली, तरी त्याला आपला उच्चप्रतीचा दर्जा व सातत्य अद्याप सिद्ध करायचे आहे. त्यामुळे पुढचे आव्हान त्याच्याकरिता अधिक कसोटीचे असेल. टेनिस हा केवळ ताकदीचा खेळ नाही. अचूक टायमिंग, डोळय़ांचे पारणे फेडणारी नजाकत, फटक्यांमधील वैविध्य, ओसंडून वाहणारी ऊर्जा या बळावर जिमी कॉनर्स, बियाँन बोर्ग, पीट सॅम्प्रस, बोरिस बेकर, आंद्रे आगासीपासून ते आत्ताच्या त्रिकुटापर्यंत कितीतरी खेळाडूंनी या खेळाला समृद्ध केले. आज या तिघांचीही कारकीर्द तशी उतरणीला लागलेली आहे. या वळणावर पुरुष टेनिसचे नवे पर्व सुरू करण्याच्या दिशेने या ताज्या दमाच्या शिलेदारांची वाटचाल होणार का, याबाबत औत्सुक्य असेल. महिला टेनिसवरही मागच्या दीड दशकात प्रामुख्याने विल्यम्स भगिनींचा वरचष्मा राहिलेला आहे. 23 गँड स्लॅम पदकांची लयलूट करणाऱया सेरेना विल्यम्स हिला मार्गारेट कोर्ट हिच्या 24 जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी केवळ एका जेतेपदाची आवश्यकता आहे. मात्र, सेरेना वादळाचा जोर 2018 पासून काहीसा ओसरलेला पहायला मिळतो. उपांत्य वा अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱया सेरेनाला विक्रमी कामगिरीकरिता झगडावे लागत आहे. तिच्यातील खेळ अद्याप शिल्लक असला, तरी यंदाही तिला 24 व्या पदकाने हुलकावणी दिल्याने आगामी स्पर्धांकडूनच तिला अपेक्षा ठेवाव्या लागतील. अर्थात सेरेनापर्व मावळत असताना नाओमीच्या रूपाने टेनिसच्या क्षितिजावर नवा तारा उगवणे, आशास्पद होय. 2019 ची ऑस्ट्रेलियन व 2018 ची अमेरिकन ओपन जिंकणाऱया ओसाकाने पुन्हा या स्पर्धेवर मोहोर उमटवत आधीची कामगिरी हा निव्वळ योगायोग नसल्याचेच दाखवून दिले आहे. पहिला सेट गमावल्यानंतर सामना फिरविणे तसे सोपे नसते. ती किमया ओसाकाने साधणे, यातूनच मनोबलात ही पिढी सरस असल्याचेच दर्शवते. आपण आता एका वेगळय़ा उंबरठय़ावर उभे आहोत, याची ओसाकालाही जाणीव असेल. त्यामुळे पुढचा टप्पा तिच्या कारकिर्दीसाठी अधिक महत्त्वाचा ठरेल. अर्थात सातत्य व दर्जा याचा मिलाफ ती कशी साधते, यावरच तिचे भवितव्य ठरणार आहे. किंबहुना टेनिसविश्वाला अमेरिकेत स्थायिक असलेल्या व जपानचे प्रतिनिधित्व करणाऱया या टेनिसपटूकडून नक्कीच आस राहील. वर्णद्वेषाविरूद्ध आवाज उठवून या गुणवान खेळाडूने आपल्यातील माणूसपणाचे घडविलेले दर्शनही तिच्या खेळाइतकेच मनोहर होय. 2014 मध्ये पोलिसी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या 12 वर्षीय तामिर राइसच्या नावाने मास्क परिधान करण्याची तिची कृती तिच्यातील संवदेनशीलपणावरच प्रकाश टाकते. जेकब ब्लॅक या कृष्णवर्णीय व्यक्तीस अमेरिकन पोलिसांनी मागच्या ऑगस्ट महिन्यात गोळय़ा घातल्याच्या निषेधार्थ तिने वेस्टर्न अँड सदर्न ओपनच्या उपांत्य फेरीतून माघार घेणे वा वर्णद्वेषाविरोधात चर्चा करण्याची भूमिका असो. त्यातून तिचा स्वतंत्र बाणाच अधोरेखित होतो. या दोन्ही विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Previous Articleपुणेकरांची थट्टा-‘मास्क’री
Next Article सांगली जिल्हय़ात 1019 रूग्ण कोरोनामुक्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.