ऑनलाईन टीम / पुणे :
गव्हाचे शेकडो दाणे, काळा मसाला, मीठ, साबुदाणा वापरुन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारण्यात आले. विविध पद्धतींनी भारतभर अटलजींना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. मात्र, पुण्यामध्ये 96 किलो गहू वापरुन केलेल्या रेखाचित्राच्या माध्यमातून अटलजींचे स्मरण करण्यात आले. तसेच चित्रयज्ञाच्या माध्यमातून सलग 12 तास लहानांपासून मोठयांपर्यंत अनेकांनी विविध चित्रे देखील साकारली.
निनाद पुणे, निनाद पतसंस्था आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त 96 किलो गहू वापरुन अटलजींचे भव्य रेखाचित्र सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे साकारण्यात आले. कलातीर्थचे अमोल काळे यांनी हे चित्र साकारले.
निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी म्हणाले, सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे वर्षातून 8 ते 10 कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम केले जातात. आदिवासी भागातील गरजूंपासून ते रिक्षाचालकांपर्यंत सर्वांना मदतीचा हात दिला जातो. यंदा अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र रेखाटून 100 किलो गहू वंचित विकास संस्थेला देण्यात आला.
कलातीर्थचे अमोल काळे म्हणाले, गव्हांच्या सहाय्याने केलेले हे चित्र रेखाटण्याकरीता सुमारे साडे तीन तासांचा कालावधी लागला. ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच चित्रांच्या माध्यमातून देखील अटलजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. ती चित्रे भारतीय जवानांना सैनिक मित्र परिवारातर्फे पाठविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.