ऑनलाईन टीम / गाझियाबाद :
उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील मुरादनगर स्मशानभूमीचे छत कोसळून मृत्यू झालेल्यांची संख्या 24 वर पोहचली आहे. तर 17 ते 18 जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाझियाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी तेथील स्थानिक माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली.
याप्रकरणी तीन दोषींना अटक करण्यात आली आहे. तर घटनेच्या तपासासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
मुरादनगरच्या डिफेन्स कॉलनीतील रहिवासी फळ विक्रेते जयराम (वय ६५) यांच्या अंत्यविधीला रविवारी लोक आले होते. अंत्यसंस्कारानंतर गेटच्या शेजारच्या गॅलरीत मौन पाळण्यासाठी हे लोक जमले असताना स्मशानभूमीचे छत कोसळले. हे छत अडीच महिन्यांपूर्वी बांधण्यात आल्याचे वृत्त आहे. बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप होत आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.