प्रतिनिधी / काणकोण
मडगाव-कारवार हायवे क्र. 66 वरील गुळे ते माशेपर्यंतचा बगलमार्ग सध्या अपघातप्रवण क्षेत्र बनलेला आहे. रस्त्याच्या डिव्हायडरच्या ठिकाणी संरक्षणार्थ झाडांची लागवड करण्यात न आल्यामुळे विशेषता रात्रीच्या वेळी या भागात अपघात होत आहेत. दर दोन दिवसांच्या आड एक असे या अपघातांचे सध्या प्रमाण बनले आहे. 22 रोजी मध्यरात्री काणकोणहून गालजीबाग येथे जाणाऱया एका कारने समोरून येणाऱया वाहनाच्या प्रखर उजेडात दिपून सदर रस्त्यावरील एका खांबाला आणि नामफलकाला धडक दिली. त्यानंतर सदर कार नाल्यात कोसळली. सुदैवाने मनुष्यहानी टळली. काणकोणच्या पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि स्थनिकांच्या मदतीने वाहनातील चालकाची सुखरूप सुटका केली.