सोमवारी मुदत संपणार, कायदेशीर ताबा घेण्यासाठी तयारी
प्रतिनिधी /बेळगाव
व्यापारी गाळय़ांप्रकरणी उच्च न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळल्यानंतर गाळे रिकामी करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजाविली होती. 45 गाळेधारकांना गाळे रिकामी करण्यासाठी दिलेली 7 दिवसांची मुदत सोमवारी संपणार आहे. त्यामुळे गाळेधारकांना हटविण्यासाठी मनपाकडून हालचाली सुरू असून विद्युतपुरवठा बंद करण्यासह गाळे ताब्यात घेण्यासाठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेऊन लिलाव प्रक्रिया राबविण्यास आक्षेप घेतला होता. लिलाव प्रक्रियेला स्थगिती घेऊन सदर गाळय़ांची भाडेकराराची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळली असून गाळे रिकामी करून लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात यावेत, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे महापालिकेने 45 गाळेधारकांना गाळे रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
कायदेशीर बाबींची पूर्तता
काही गाळेधारकांनी स्थानिक न्यायालयात धाव घेऊन लिलाव प्रक्रियेस पुन्हा स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. गाळे रिकामी करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सोमवार दि. 10 रोजी ही मुदत संपणार असून गाळे ताब्यात घेण्यासाठी महसूल विभागाने आवश्यक प्रक्रिया हाती घेतली आहे. पोलीस स्थानकात माहिती देऊन गाळे ताब्यात घेतले जाणार आहेत. याकरिता रितसर कायदेशीर बाबींची पूर्तता महापालिकेच्या महसूल विभागाने चालविली आहे.
त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून गाळय़ांमध्ये ठाण मांडलेल्या व्यावसायिकांना हटविण्यासाठी पुढील आठवडय़ात ठोस पावले उचलण्याची शक्मयता आहे.