ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील 36 शहरांमध्ये जारी असलेला नाईट कर्फ्यूच्या वेळेत आणखी एका तासाची सूट देण्यात आली आहे. मात्र, दिवसा सुरू असलेले निर्बंध कायम असणार आहे.
बुधवारी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर येथे झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शुक्रवार पासून राज्यातील 36 शहरांमध्ये आता रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. दरम्यान, सध्या राज्यात रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू चालू आहे.
पुढे ते म्हणाले की, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. 30 एप्रिल रोजी राज्यात सर्वात जास्त म्हणजेच 14, 600 रुग्ण आढळून आले होते. तर आता सद्य स्थितीत राज्यात हाच आकडा (एका दिवसाचा) 3,200 इतका आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील नाईट कर्फ्यू एका तासाने कमी करण्यात आला असून आता रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.
पुढे ते म्हणाले, गुरुवारी याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. सद्य स्थितीत राज्यातील अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट सह 36 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू आहे. या शहरात सकाळच्या वेळेत जारी करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात नाही आले आहेत.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 3,255 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 44 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण संख्या 7 लाख 94 हजार 912 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 9,655 जणांचा मृत्यू झाला आहे.