प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या आठ दिवसांपूर्वी भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात चोरीची घटना घडली होती. बिकॉममध्ये नापास झालेल्या एका विद्यार्थ्यांने 300 गुणपत्रिकांची चोरी केली होती. या प्रकरणी येत्या 15 दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
बसाप्पा शिवलिंगाप्पा होनवाड (वय 30, रा. कुडची, ता. जमखंडी, जि. बागलकोट) या विद्यार्थ्याला चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱयांनी बसाप्पाला अटक करुन त्याने विद्यापीठातून चोरलेल्या गुणपत्रिका पोलिसांनी जप्त केले होते.
यासंबंधी मूल्यमापन विभागाचे कुलसचिव डॉ. अशोक डिसोजा यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. बसाप्पाची करामत सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली असून पोलिसांनी विद्यापीठातून फुटेज ताब्यात घेतले आहे. स्वच्छतागृहाची काच फोडून मूल्यमापन विभागात प्रवेश केलेल्याविभागाने कपाटांची कुलप उघडून गुणपत्रिकांची चोरी केली होती.
काकती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जवळजवळ पूर्ण केला आहे. मूल्यमापन विभागातून चोरलेल्या 300 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व दोन स्कॅनर जप्त करण्यात आले आहेत. येत्या 15 दिवसांत या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येत येईल, असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.