बोलण्याच्या नादात किंवा थोडीफार जवळीक झाल्यानंतर आपण महत्त्वाची माहिती दुसर्यांना सांगून मोकळे होतो. घरातले वादविवाद, अडचणीही शेअर करतो. मात्र आपली वैयक्तिक माहिती इतरांसोबत शेअर करताना काळजी घ्यायला हवी. सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही हे महत्त्वाचं आहे. कोणत्या गोष्टींमध्ये गोपनीयता बाळगायला हवी याविषयी…
* एटीएमचा पिन क्रमांक असो किंवा ईमेलचा पासवर्ड, ही माहिती कोणासोबतही शेअर करू नका. समोरची व्यक्ती कितीही जवळची असली किंवा घट्ट मैत्री असली तरी पासवर्ड, पिन क्रमांक जगजाहीर होऊ देऊ नका. तुम्ही आणि कुटुंबातल्या सदस्यांव्यतिरिक्त या बाबी इतरांना कळता कामा नयेत.
* विमा पॉलिसी, आर्थिक घडामोडी, गुंतवणूक , तुमचे वारसदार याबाबतची माहितीही कुठे शेअर करू नका. तुमच्याकडच्या क्रेडिट कार्डसची संख्या, बँकेतली शिल्लक, तुमची कमाई याबाबतही वाच्यता करू नका.
* घरातल्या व्यक्तींपैकी कोण, कुठे किती वाजता जातं हे लोकांना सांगू नका. सोशल मीडियावरही याबाबत काहीच शेअर करू नका. तुम्ही घरात नाही हे कोणालाही कळता कामा नये. * घरातले वादविवाद, भांडणं घरातच ठेवा. ही प्रकरणं सामंजस्याने सोडवा. यात इतरांना आणू नका. उगाचच आपल्या घरातल्या भांडणांबाबत सांगून इतरांचं मनोरंजन करू नका. कारण आपल्याबद्दल आत्मियता वाटणारी माणसं खूप कमी असतात. उर्वरित लोकांना आपल्या अडचणी, दुःख आनंद देऊन जातं. त्यामुळे घरातल्याव्यतिरिक्त इतर कोणालाही आपल्या समस्या सांगू नका.