पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल, हॉस्पिटल सुरू होण्याच्या आशा पल्लवीत
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील अनेक वर्षे बंद असलेले दाभोळ पॉवर कंपनीचे सुसज्ज निरामय हॉस्पिटल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शिवतेज फाऊंडेशनने पाठवलेल्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींच्या पूर्तता करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. शिवतेजचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी यांना तसे पत्र प्राप्त झाले झाल्याने ‘निरामय’चे कुलुप लवकरच उघडणार आहे.
राज्यातील बहुचर्चित एन्रॉनच्या दाभोळ पॉवर कंपनीने वीज प्रकल्प उभारणीबरोबर येथील जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी रानवी येथे अद्ययावत सुविधांनीयुक्त निरामय हॉस्पिटल उभारले होते. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांबरोबरच उपचार करण्यासाठी परदेशातूनही डॉक्टरही येत होते. लगतच्या तालुक्यांनाही त्याचा उपयोग होत होता, परंतु एन्रॉन बंद पडल्यावर दाभोळ पॉवर कंपनीही दिवाळखोरीत गेल्यानंतर हॉस्पिटलही बंद झाले.
हॉस्पिटल सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र शासनस्तरावर कुणीच दखल घेतली नाही. कोकणातील आरोग्याची सुविधा पाहता सध्या कोरोना विषाणूच्या समस्येला तोंड देण्यासाठी जर या हॉस्पिटलची अद्ययावत इमारत शासनाने स्वतःच्या ताब्यात घेतल्यास त्याठिकाणी रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल, जेणेकरून कोकणातील जनतेला याचा फायदा होईल. याबाबत शिवतेज फाऊंडेशनच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले होते.
याचबरोबर शिवतेज फाऊंडेशनने सोशल मिडियावर निरामय हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी आपली सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन जनतेला केले होते. याची दखल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली होती. जिल्हाधिकाऱयांनीसुद्धा गुहागर तहसील कार्यालयाला पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु या हॉस्पिटल इमारतीची चावी न मिळाल्याने आजपर्यंत तरी अधिकारी पाहणीसाठी आले नाहीत. त्यानंतर माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या पाठपुराव्यातून केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पुढील कार्यवाहीचे पत्र दिले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयातर्फे पुढील कार्यवाहीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या असल्याचे शिवतेज फाऊंडेशनच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता हॉस्पिटल पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.