अन्य पाच जणांवरही कारवाई ः छाप्यात कोटय़वधींचे रोकड-दागिने जप्त
नोएडा / वृत्तसंस्था
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (गेल) मार्केटिंग विभागाचे संचालक ई. एस. रंगनाथन यांच्यासह सहा जणांना रविवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने अटक केली. लाच घेऊन पेट्रो उत्पादनांमध्ये सूट दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींच्या नोएडा आणि दिल्लीस्थित घरांवर शनिवारी छापा टाकण्यात आला होता. या छाप्यादरम्यान सापडलेल्या संशयास्पद दस्तावेजामुळे संबंधितांवर तातडीने अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच या छाप्यांमध्ये सुमारे 1.29 कोटी रुपयांची रोकड आणि 1.30 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर चौकशीसाठी रिमांडवर घेण्यात आले आहे.
गेलचे मार्केटिंग संचालक ई. एस. रंगनाथन यांच्या नोएडा येथील घरावर सर्वप्रथम छापेमारी करण्यात आली. यावेळी रोख रकमेसह मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता हाती लागली. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. सीबीआयने गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकला होता. सीबीआयने याप्रकरणी विविध फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गेलच्या मार्केटिंग संचालकांसह मध्यस्थ आणि एका खासगी कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली होती. छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू असून, लाच प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात गेल कंपनीतील आणखी काही उच्चाधिकाऱयांवर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.