40 लाखांचा ऐवज जप्त : बेळगावसह महाराष्ट्रातील दहा जण अटकेत : गोकाक पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/वार्ताहर /बेळगाव, घटप्रभा
लोखंडी रॉडने हल्ला करून सराफी दुकानदाराला लुटणाऱया टोळीला गोकाक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील 35 लाख रुपये सोन्यांसह चार दुचाकीसह 40 लाखाचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी केवळ 10 दिवसांत बेळगावसह महाराष्ट्रातील आरोपींना अटक करून या प्रकरणाचा छडा लावला असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
आहे.
सिद्राय ऊर्फ सिधू चांगदेव कडोलकर (वय 21, रा. कोनवाळ गल्ली, कणबर्गी), प्रदीप बसवराज बुशी (वय 21, रा. कित्तूर खिंड, दुसरा बसस्टॉप कणबर्गी), मारुती राजू साळुंखे (वय 23, रा. एकलक्यनगर, कणबर्गी), सौरभ लक्ष्मण मालाई (वय 19, रा. कोनवाळ गल्ली, कणबर्गी), निवृत्ती आप्पाराव मोदगेकर (वय 24, रा. मारुती गल्ली, सोनोली), अनिल रामचंद्र पत्तार (रा. मेळवंकी), पंकज खांडेकर (रा. शिनोळी, ता. चंदगड), विजय नागोबा कदम (रा. कुदेमनी), सागर पाटील (रा. कुदेमनी), मनोहर सोनार (रा. तुर्केवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, अनिल रामचंद्र पत्तार हा आरोपी फिर्यादी संजीव सदानंद पोतदार (रा. सिंधीकुरबेट, ता. गोकाक) यांच्या दुकानामध्ये कामाला होता. मात्र काही कारणाने अनिल याला कामावरून कमी करण्यात आले. कामावरून कमी केल्याचा राग धरून त्याने दरोडा घालणाऱया सर्वांना दुकानमालक कधी येतात, कधी जातात आणि जाताना ऐवज कसा घेऊन जातात, ही सर्व माहिती दरोडेखोरांना दिली.
फिर्यादी संजीव आणि त्यांचे भाऊ रविंद्र सदानंद पवार हे दररोज सिंधीकुरबेट येथून गोकाक येथे आपल्या सराफी दुकानामध्ये ये-जा करत होते. दररोज दुकानामध्ये व्यवसाय केल्यानंतर उरलेले सोने तसेच रक्कम ते घेऊन जात होते.
16 सप्टेंबर रोजी ते गावाकडे रात्री जात असताना 4 दुचाकीवरून आलेल्या आठ आरोपींनी लोळसूर गावाजवळील करेम्मा मंदिरजवळ त्यांना अडविले. त्यांच्यावर रॉडने हल्ला केला. त्यानंतर त्यांच्याकडील बॅग हिसकावून नेली होती. त्यानंतर संजीव पोतदार यांनी घटप्रभा पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली होती.
या प्रकरणी दोन पथके नेमण्यात आली. ही पथके महाराष्ट्र तसेच गोवा आणि बेळगाव परिसरात पाठवून या आरोपींचा शोध घेण्यात आला. यामधील 8 आरोपींना प्रारंभी अटक केली. या प्रकरणामध्ये सामील असलेल्या दोन आरोपींनाही अटक करण्यात आले. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली घटप्रभा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल बॅकुड, जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. या आरोपींकडून 240 ग्रॅम सोने, 44 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 35 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त केला. याचबरोबर 3 मोटारसायकली देखील जप्त केल्या आहेत. एकूण 40 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.