प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी ठराव जमा करण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने सत्ताधारी विरोधी आघाडीत गठ्ठा ठराव जमा करण्यासाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी गटाकडून आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात सोमवारी संस्थांकडून ठराव स्वीकारणार असून त्यानंतर प्राधिकृत अधिकाऱयांकडे शक्तीप्रदर्शनाने ठराव जमा करण्यात आहेत. दरम्यान्। विरोधी आघाडीकडूनही याच दिवशी काही अंतराने ठराव दाखल होणार आहेत. अंतिमक्षणी ठराव धारकांचे शक्तीप्रदर्शन विचारात घेवून निवडणूक कार्यालयाबाहेर मंडप उभारण्यात आला आहे.
राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाची गोकुळची निवडणूक कमालीची चुरशीची आणि अटीतटीची होणार आहे. महाडिक, पी. एन. पाटील यांच्याविरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोट बांधली आहे.
सकाळी गोकुळ, दुपारनंतर राजाराम कारखान्यावरुन सूत्रे
कोणत्याही परिस्थिती गोकुळची सत्ता गमवायची नाही, असा चंग सत्ताधारी गटाने बांधला आहे. यासाठी काही तडजोडी करण्याचीही तयारी ठेवली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक गेली दोन दिवसांपासून सक्रिय झाले असून सकाळी आठ वाजलेपासूनच ते गोकुळच्या ताराबाई पार्क येथील मुख्यालयात तळ ठोकून असतात. तेथून संचालक, समर्थकांना सूचना, जोडण्या कशा लावायच्या याबाबत मार्गदर्शन करत आहेत. दुपारनंतर ही सूत्रे राजाराम कारखान्यावरुन हालत आहे.
27 दिवसात 174 ठराव
21 डिसेंबरपासून गोकुळसाठी ठराव जमा स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. यासाठी सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. चुरशी लढत लक्षात घेऊन संस्थाचालकांनीही सावध भूमिका घेतल्याने ठराव दाखल होण्याचा वेग मंद आहे. शुक्रवार अखेर केवळ 174 ठराव जमा झाले आहेत. आहेत. रविवारी साप्तहिक सुट्टी असल्याने उद्या शनिवार, सोमवार व मंगळवार असे केवळ 3 दिवसच शिल्लक आहेत. या काळात मोठय़ा संख्येने ठराव दाखल होणार आहेत.
विरोधी आघाडीचे तालुकानिहाय नियोजन
सत्ताधारी गटाला शह देण्यासाठी विरोधी आघाडीकडून तालुकानिहाय नियोजन सुरु केले आहे. प्रत्येक तालुक्यातून किती ठराव जमा झाले याचा आढावा ‘अजिंक्यतारा’वरुन घेतला जात आहे. माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राथनिधीक स्वरुपात सोमवारी दुपारी ठराव जमा करण्यात येणार आहेत.