प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमिवर सध्या राज्यात अतिदक्षता विभागासाठी (आयसीयु) कर्मचारी कमी पडत आहे. खासकरुन प्रशिक्षित नर्सेसचा अभाव आहे. या अनुषंगाने नवीन नर्सेस घेण्यासाठी सरकार कार्यरत आहे. त्याचप्रमाणे ज्या नर्सेस नवीन घेण्यात आले आहे त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात, इएसआय हॉस्पिटल मडगाव व फोंडा येथील जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के
अतिरिक्त ऑक्सिजनचीसुद्धा सध्या राज्यात गरज भासत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणी सुरु असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींची कमतरता भासत आहे. यावर लवकरच मुख्यमंत्र्याच्या मदतीने निर्णय घेण्यात येणार आहे. गोवा टेस्टिंगमध्ये देशात प्रथम आहे. गोव्यातील मृत्युचा दर 1 टक्क्यापेक्षा कमी आहे, तर बरे होण्याचे प्रमाण जवळपास 80 टक्के आहे. त्यामुळे घाबरुन जाण्यासारखे काहीच नाही, असे राणे यांनी पुढे सांगितले.
सुमारे जवळपास 300 कोरोना रुग्ण लक्षणे दिसणारे आहेत. यातील 202 मडगाव येथील इएसआय हॉस्पिटल येथे, 64 जीएमसी येथे तर 28 फोंडा येथे उपचार घेत आहेत. डब्लूएचओ मते 15 लाख लोकसंख्या असलेल्या देशात किंवा राज्यात किमान दोन हजार व्हेंटीलेटर असणे गरजेचे आहे. आमच्याकडे जवळपास 270 व्हेंटीलेटर असून सध्या आम्हाला बऱयापैकी पुरत आहे. तसेच ज्या खासगी हॉस्पिटललासुद्धा व्हेंटीलेटरची गरज भासल्यास आम्ही त्यांना वेळोवेळी ते प्रदान केले आहेत, असेही ते म्हणाले.
गोमेकॉत खास आयसीयू
गोव्यात जास्त प्रमाणात को-मोर्बीट मृत्यूचा दर वाढत आहे. यासंदर्भात गोव्यातील तज्ञ डॉक्टरांची समिती असून त्यांच्याशी आठवडय़ातून एकदा बैठक घेतली जाते. या समितीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभाग सुरु करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार सोमवारपासून जीएमसीतील वॉर्ड क्र. 145, 146 व 147 अतिदक्षता विभाग म्हणून सुरु करण्यात येणार आहे. या वॉर्डमध्ये ज्यांना जास्त प्रमाणात मल्टीपल उपचाराची गरज आहे त्यांनाच ठेवण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे
जे रुग्ण सध्या या कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपला प्लाझ्मा दान करावा, जेणेकरुन आम्ही आणखी काही जणांना या भयानक रोगातून बाहेर काढू शकतो. तसेच यावर लोकांमध्ये जागृती होणे देखील आवश्यक आहे. आतापर्यंत 61 प्लाझ्मा आम्हाला मिळाले आहेत. यातील 14 प्लाझ्मा सध्या आमच्याकडे शिल्लक राहिले आहेत. तेव्हा लोकांनी मोठय़ा प्रमाणात पुढे येऊन आपला प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.
हेल्थ सेक्टर मोठय़ा प्रमाणात सक्रिय
आरोग्य सेवा, जीएमसी, इएसआय हॉस्पिटल मोठय़ा प्रमाणात सक्रिय आहेत. प्रत्येक डॉक्टर, नर्स, अटेंडंट आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवत आहे. त्यांच्या साहाय्यानेच आम्ही चांगल्या प्रकारे काम करु शकतो. तसेच राज्यातील इतर डॉक्टर देखील आमच्या या कामात मदत करायला पुढे येत आहेत. त्यांचाही आम्ही यात समावेश करुन घेतला आहे. आणखी जर इतर डॉक्टर या कार्यात मदत करु इच्छितो तर त्यांचेही आम्ही स्वागत करु, असे राणे यांनी पुढे सांगितले.
आमदार, मंत्र्यांची प्रकृती स्थिर
गेल्या काही दिवसांमध्ये केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, आमदार सुदिन ढवळीकर, चर्चिल आलेमाव, नीळकंठ हळर्णकर, रवी नाईक हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार होत आहेत. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. मणिपाल हॉस्पिटलमध्ये सर्वांवर उपचार सुरु आहेत, असे राणे यांनी यावेळी सांगितले.