प्रतिनिधी/ वास्को
गोव्याच्या कस्टम विभागाने सुमारे पाच कोटी रूपये किमतीचा अमली पदार्थ शुक्रवारी नष्ट केला. हा अमली पदार्थ कस्टम विभागाने व महसुल संचालनालयाने वेळोवेळी केलेल्या कारवाईत दाबोळी विमानतळ तसेच अन्य ठिकाणी जप्त केला होता.
गोवा कस्टम विभागाचे आयुक्त मिहीर रंजन व अमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोवा कस्टम विभाग तसेच महसुल संचालनालय यांनी दाबोळी विमानतळ तसेच अन्य काही ठिकाणी केलेल्या कारवाई घन, द्रव्व व पावडर स्वरूपातील विविध प्रकारचे मादक पदार्थ जप्त केले होते. या मादक पदार्थ साठय़ाची किंमत जवळपास पाच कोटी रूपये होती. गोमेकॉमध्ये हा मादक पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. गोमेकॉमध्ये असे पदार्थ नष्ट करण्याची सुविधा आहे. कस्टमचे सह आयुक्त प्रज्ञशील जुमले, कस्टमचे उपआयुक्त डॉ. राघवेंद्र पी. व सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांचा समावेश असलेल्या समिती नियंत्रणाखाली हा अमली पदार्थ नष्ट करण्यात आला.
अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी काल शुक्रवारी 11.30 वाजल्यापासून देशव्यापी मोहिम सुरू झालेली असून त्या मोहिमेअंतर्गंतच ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य लाभले.