सहकार निबंधकांकडे प्रशासकीय समितीची मागणी
प्रतिनिधी /फोंडा
गोवा डेअरीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते यांना तात्काळ पदावरुन हटवून त्याजागी नवीन व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्त करण्याची मागणी डेअरीच्या प्रशासकीय समितीने केली आहे. डेअरीच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी तसे लेखी पत्र राज्य सहकार निबंधकांना पाठविले आहे.
शिस्तभंग प्रकरणी डॉ. फडते यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी, असे या लेखी निवेदनात म्हटले आहे. सरकारच्या निर्देशानुसार काही ठराविक काळासाठी प्रभारी एम.डी. म्हणून डॉ. फडते यांच्याकडे ताबा देण्यात आलेला आहे. प्रशाकीय समितीने घेतलेल्या काही निर्णयांच्या अंमलबजावणीकडे डॉ. फडते यांनी दुर्लक्ष केले असून डेअरी प्रशासनात त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे. प्रशासकीय समितीने त्यांचे हे वर्तन गांभिर्याने घेऊन त्यांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीला डॉ. फडते यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही, असे सहकार निबंधकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. गोवा डेअरीमध्ये यापूर्वी झालेल्या काही आर्थिक गैरव्यवहारामध्ये डॉ. फडते यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी व्हायची असल्यास त्यांना व्यवस्थापकीय संचालकपदावरुन हटवावे लागेल. गोवा डेअरीच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱयावर सध्या खात्याअंतर्गत चौकशी सुरु आहे. या महिला अधिकाऱयांची डॉ. फडते यांच्याकडून सतावणूक चालल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. सहकार निबंधकांनी या पत्राची दखल घेऊन डॉ. फडते यांना प्रभारी एमडी पदावरुन हटवावे व पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकपद भरेपर्यंत डेअरीचे वरिष्ठ केमिस्ट काशी नाईक यांच्याकडे हा ताबा द्यावा अशी मागणी अध्यक्ष शिरोडकर यांनी केली आहे.