क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेली एफसी गोवा आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. एफसी गोव्यासाठी इगोर अँग्युलो तर ईस्ट बंगालसाठी कप्तान डॅनियल फॉक्सने गोल केले.
या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. एफसी गोवाचे तिसरे स्थान अबाधित राहिले. एफसी गोवाचे 14 सामन्यांतून पाच विजय, सहा बरोबरी आणि तीन पराभवाने 21 गुण झाले. ईस्ट बंगालचे 14 सामन्यांतून दोन विजय, सात बरोबरी आणि पाच पराभवाने आता 13 गुण झाले व त्यांचही दहावे स्थान कायम राहिले.
एफसी गोवाचा खेळ काल त्यांच्या लौकीकास साजेसा झाला नाही. दुसऱया सत्रात ईस्ट बंगालच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा बचाव डळमळीत झाला. सॅरीटोन फर्नांडिस, इव्हान गोन्झालीझ आणि जेम्स डोनाची यांया बचावफळीतील अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. धीरज सिंगच्या उत्कृष्ट गोलरक्षणानेही ईस्ट बंगालला विजयापासून दूर नेले. सामन्याच्या 66व्या मिनिटांपासून एफसी गोवाला दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. कप्तान एदू बेडियाला या सामन्यात दोन एलो कार्डे मिळाल्याने त्याला रेड कार्ड दाखवून मैदान सोडावे लागले.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला ईस्ट बंगालने पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमविली. एफसी गोवाचा बचावपटू मोहम्मद अलीने ईस्ट बंगालच्या नारायण दासला बॉक्समध्ये पाडले. यामुळे ईस्ट बंगालला मिळालेली पेनल्टी अँथनी पिलकिंगटनने बाहेर मारून वाया घालविली. त्यानंतर एफसी गोवाच्या इगोरचा गोल करण्याचा यत्न ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदारने अडविला तर एदू बेडियाचा फ्रिकीक दिशाहीन ठरला.
लढतीच्या 37व्या मिनिटाला जॉर्गे ऑर्तिजचा फ्रिकीक मजुमदारने अडविल्यानंतर दोनच मिनिटानी एफसी गोवाने गोल केला आणि आघाडी घेतली. आल्बेर्तो नोगुएराने दिलेल्या पासवर इगोरने यावेळी देबजित मजुमदारला सहज चकविले आणि चेंडू जाळीत टोलविला. हा गोल इगोरचा दहावा गोल ठरला.
दुसऱया सत्रात ईस्ट बंगालने एफसी गोवाचा एक खेळाडू कमी झालेल्याचा फायदा उठविला आणि निरंतर आक्रमणांची मालिकाच रचली. काल सामनावीर पुरस्कार मिळविलेला ब्राईटने तर एफसी गोवाची बचावफळी कित्येकदा भेदली. 65व्या मिनिटाला गोलरक्षक धीरज सिंगच्या चुकीचा फायदा घेत डॅनियल फॉक्सने ईस्ट बंगालचा बरोबरीचा गोल केला. शेवटच्या पंधरा मिनिटांच्या खेळाच्या दरम्यान गोव्याचा गोलरक्षक धीरज सिंगने दोन वेळा ईस्ट बंगालचे गोल करण्याचे यत्न उधळून लावले.