अनेक ठिकाणी कोसळल्या दरडी : पावसामुळे अजूनही धोका कायम
वाळपई / प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात पडणाऱया पावसामुळे काल बुधवारी सकाळी गोवा-बेळगाव महामार्गावर चोर्ला घाट परिसरामध्ये तीन ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जवळपास सहा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील सर्व दरडी हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा सदर भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा दरडी कोसळण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
या महामार्गावरून प्रवास करणाऱया वाहन चालकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन सरकारच्या संबंधित खात्याच्या यंत्रणेने केले आहे.
झाडे पडली, दरडी कोसळल्या
मंगळवारी आठ ठिकाणी पडलेली झाडे रात्री उशिरापर्यंत मोकळी करण्यात आली होती. त्यामुळे सदर मार्गावरील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नव्हता. मंगळवारी रात्रभर व बुधवारी सकाळी सदर घाट परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे एकूण तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. सदर प्रकार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
याबाबतची माहिती मिळताच सार्वजनिक रस्ता विभागाचे वाळपई सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर, कनि÷ अभियंता झिलबाराव देसाई, वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस, पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर आदीनी धाव घेऊन रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. अग्निशामक दलाने झाडे हटवून रस्ता मोकळा केला. रस्ता विभागाच्या यंत्रणेने खास मशिनची व्यवस्था करून रस्त्यावर कोसळलेली माती दूर केली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्याची माहिती सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी दिली. वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.