मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : जिल्हाधिकारी जारी करणार आदेश
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य लवकरच ‘मास्कमुक्त’ करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यासंदर्भात आदेश जारी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपच्या स्थापना दिन व सत्यनारायण महापूजेसाठी भाजप कार्यालयात आले असताना डॉ. सावंत प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यात मास्कमुक्ती जाहीर केली असून अनेक राज्यांनी मास्कचे निर्बंध मागे घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांना त्याबाबत विचारणा केली असता गोवा आता लवरकरच मास्कमुक्त होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
‘नो मास्क नो एन्ट्री’ फलक आजही कायम
गेली सुमारे दोन वर्षे गोव्याची जनता मास्क वापरून जगत आहे. मास्क नसेल तर अनेक ठिकाणी प्रवेशबंधी करण्यात आली होती. सरकारी कार्यालये, खासगी अस्थापने, दुकाने हॉटेल्स, हॉस्पिटल्स अशा सर्व ठिकाणी ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे फलकच लावण्यात आले होते, आजही ते फलक कायम आहेत.
अनेकांना मास्क वापरण्याची सवय जडली
कोरोना काळात मास्कची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे अनेकांनी मास्क तयार करणे त्यांची खरेदी-विक्री करणे, असे व्यावसायही केले. दंड भरावा लागू नये म्हणून लोकांना मास्क वापरण्याची सवयच लागली. अनेकांना त्याचा त्रासही सोसावा लागला. श्वास घेणे कठीण बनले. परंतु, तो मास्क घालणे बंधनकारक असल्याने अनेकजण फक्त तोंडावर ठेवू लागले.
वाढत्या कोरोनाबरोबर वापर, दरही वाढला
कोरोनाचा संसर्ग वाढला तशी मास्कची किंमतही वाढत राहिली. प्रथम तो रु. 5 ते 10 पर्यंत मिळायचा. नंतर त्यह मास्कची किंमत रु 100 पर्यंत वाढली. त्यामुळे लोकांना खर्च सहन करावा लागला. कोरोना बळी वाढले. प्रतिदिन ते 70 ते 75 पर्यंत गेले. त्यामुळे मास्कचा वापर वाढतच राहिला आता संसर्ग कमी झाल्यामुळे मास्कच्या किमतीदेखील कमी झाल्याचे दिसून आले आहे.
उद्ध्वस्त मंदिर उभारणी प्रक्रिया सुरु
पोर्तुगीज काळात उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा बांधण्याची प्रक्रिया पुरातत्व खात्याने सुरू केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात रु 20 कोटीची तरतूद केली आहे. मालदीव पर्यटनस्थळाला पर्याय म्हणून गोवा पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येणार असून तशा साधनसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
गोवा देशाची पर्यटन राजधानी बनणार
गोवा ही देशाची पर्यटन राजधानी करण्याचा इरादा असून इतर विविध प्रकारच्या पर्यटनास बराच वाव आहे. ऐतिहासिक, संस्कृती, वैद्यकीय पर्यटनसाठी गोवा राज्य महत्त्वाचे आहे. त्याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.