गेल्या सहा वर्षात 1660 कोटी निधीचा उपयोग : निधीच्या वापरासाठी 53 नव्या योजनांचा शोध
प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारने 2014-15 ते 2020-21 या एकूण सहा वर्षात केंद्र सरकारच्या 200 पेक्षा अधिक योजना राबवल्या असून वरील कालावधीत केंद्राने दिलेल्या एकूण 2039.71 कोटी निधीपैकी रु. 1660.05 कोटी निधीचा वापर केला आहे. राज्याने एकूण 81.39 टक्के निधी उपयोगात आणला आहे.
विविध खात्यांच्या केंद्रीय मंत्रालयांना निधी वापराचे प्रमाणपत्र सादर करुन अधिकाधिक केंद्रीय निधी मिळवण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत. केंद्रीय निधीचा सर्वाधिक वापर गोवा राज्य सरकारने केला आहे.
राज्याने केंद्राच्या 53 योजना घेतल्या
केंद्र सरकारच्या अनेक योजना गोवा राज्याला लागू होत्या, परंतु त्यांची कार्यवाही होत नव्हती. राज्यातील 13 सरकारी खात्यांनी 53 नव्या योजना शोधून काढल्या. त्यातील 44 योजनांचा प्रकल्प अहवाल केंद्राला सादर केला आहे. त्यातील 9 योजनांना मान्यता मिळाली असून त्यासाठीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’
योजना शोधणे, त्या अंमलात आणणे आणि त्याची कार्यवाही करणे ही कामे राज्य सरकारतर्फे सातत्याने चालू असून शहरी व ग्रामीण भागात त्याची माहिती पोहोचावी म्हणून ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम नेटाने पुन्हा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
गेल्या 6 वर्षात म्हणजे 2014-15 ते 2020-21 या कालावधीत 200 पेक्षा अधिक केंद्रीय योजना गोव्यासाठी राबवण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.
गोव्याला मिळालेला व वापरलेला निधी
वर्ष मिळालेला निधी वापरलेला निधी टक्केवारी
- (कोटी) (कोटी)
- 2014-15 206.48 158.42 76.22
- 2015-16 177.27 171.03 96.48
- 2016-17 259.99 212.55 81.75
- 2017-18 493.99 253.54 51.32
- 2018-19 284.15 228.76 80.51
- 2019-20 314.90 339.95 107.95
- 2020-21 302.93 295.80 97.65