वीजमंत्री काब्राल यांचा दिल्ला सरकारला टोला
प्रतिनिधी / पणजी
दिल्ली सरकारच्या तुलनेत गोवा सरकारचे वीज दर खूपच कमी असल्याचा दावा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केला असून तेथील सरकारने गोव्यातील वीजदरांचा प्रथम अभ्यास करावा आणि मगच बोलावे, असा टोमणा त्यांनी मारला आहे.
काब्राल म्हणाले की, दिल्ली सरकारतर्फे 0 ते 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येत असली तरी 200 युनिटनंतर तेथील दर अत्यंत महागडे आहेत. ते दर रु. 14 प्रति युनिटपर्यंत जातात तर गोव्यातील कमाल दर रू. 4 प्रति युनिट आहेत. त्यापेक्षा जास्त दर गोव्यात नाहीत याची जाणीव आपच्या दिल्ली सरकारने ठेवावी.
गोव्याचे वीज दर देशात सर्वांत कमी
गोव्याचे वीज दर देशात सर्वात कमी आहेत. गोव्यात वीज तयार होत नाही तर ती विकत घेऊन बाहेरून आणून पुरवावी लागते. गोव्यातील दर रू. 1.20 प्रति युनिटपासून सुरू होतात आणि जास्तीत जास्त दर रू. 4 एवढा आहे. दिल्लीचे दर 200 युनिटनंतर रू. 4 पासून प्रति युनिट सुरू होतात आणि ते रू. 14 प्रति युनिटपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत.
दिल्ली सरकारने अभ्यास करावा दोन्ही राज्यातील वीजदरांची तुलना केली तर गोव्यातील दर दिल्लीपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहेत, असे स्पष्टीकरण काब्राल यांनी दिले आहे. गोव्यात येऊन दिल्ली सरकारने वीजदरांचा अभ्यास केल्यास प्रवास खर्च देण्याची तयारी काब्राल यांनी दर्शवली आहे. गोव्यात इतर अनेक योजना आहेत त्या दिल्ली सरकारकडे आहेत काय? अशी विचारणाही काब्राल यांनी केली आहे.