भाजपतर्फे पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय
गोवा : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल येऊन बराच अवधी झाला आहे. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरुन या राज्यांमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. यातच गोव्यातही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश मिळाले आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सुरु असलेली रस्सीखेच अखेर भाजपच्या विजयाने संपली.
दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री पदावरुन राज्यातील राजकीय नाट्य वेगाने बदलत होती. मात्र गोव्यात पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बाजी मारत मुख्यमंत्री पदावर आपली मोहोर उमटवली आहे. मागील काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु होती. पण आता विश्वजित राणे यांची नाराजी दूर करत भाजपने प्रमोद सावंत यांची विधीमंडळ नेता म्हणून एकमताने निवड केली आहे. आता ते थोड्याच वेळात राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.