भाकड काळातील जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार : दूध-शेणापासून उपपदार्थ तयार केले जाणार
प्रतिनिधी /बेळगाव
भाकड काळातील जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हय़ात गोशाळा उभारली जात आहे. तब्बल 200 जनावरांची क्षमता असणारी ही गोशाळा उभारली जात असल्याने जिल्हय़ातील भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गोशाळेचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही दिवसात पूर्णत्वाकडे येणार आहे. त्यानंतर गोशाळा भाकड जनावरांसाठी खुली केली जाणार आहे, अशी माहिती पशुसंगोपनने दिली आहे.
महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ही गोशाळा उभारली जात आहे. त्यामध्ये भाकड जनावरांच्या संगोपनाबरोबर दूध आणि शेणापासून इतर उपपदार्थ तयार केले जाणार आहेत. विशेषतः सेंद्रिय खत आणि इतर वस्तू तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे गोशाळेतून उत्पन्नदेखील निर्माण होणार आहे.
हुक्केरी तालुक्मयातील बेळवी या ठिकाणी ही गोशाळा उभारली जात आहे. तब्बल 19.4 एकर क्षेत्रात या गोशाळेचा विकास साधला जात आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेकडो भाकड काळातील गायींचा प्रश्न सुटणार आहे. राज्यात पुण्यकोटी दत्तक योजना राबवून प्रत्येक जिल्हय़ात गोशाळा उभारल्या जात आहेत. काही ठिकाणी गोशाळांचे काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी पूर्णत्वाकडे आले आहे. काम पूर्ण झालेल्या गोशाळांमध्ये गायींची देखभाल सुरू झाली आहे. बेळवी या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या गोशाळेमध्ये विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. गायींना बांधण्यासाठी विशेष गोठा, त्याबरोबर गोमूत्र आणि शेणाच्या साठय़ासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे.
भाकड काळातील जनावरे विशेषतः कत्तलखान्याकडे पाठविली जातात. हे थांबविण्यासाठी ही गोशाळा उभारली जात आहे. या गोशाळेमध्ये देशी आणि इतर गायींना देखील प्रवेश दिला जाणार आहे. याबरोबर गोशाळेतील गायी दत्तक दिल्या जाणार आहेत. त्यामुळे संघ-संस्था एखाद्या गायीचा देखभालीचा खर्च उचलू शकतात.
गायींवर उपचार होणार
दूध आटलेली म्हणजेच भाकड काळातील जनावरे अधिक आहेत. यांचे संगोपन व्हावे, या उद्देशाने ही गोशाळा उभारली जात आहे. गायींना गोशाळेत प्रवेश देण्याबरोबर त्यांच्यावर उपचार आणि इतर सुविधा देखील पुरविल्या जाणार आहेत. राज्यात गोवंशीय प्राण्यांच्या वाहतूक आणि कत्तलीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, प्राण्यांची चोरून वाहतूक आणि कत्तल सुरू आहे. मात्र, आता गोशाळा उभारली जात असल्याने या वाहतुकीला देखील आळा बसणार आहे.
देशी गायींच्या संगोपनासाठी गोशाळा
जिल्हय़ासाठी हुक्केरी तालुक्मयातील बेळवीमध्ये गोशाळा उभारली जात आहे. काम जोमाने सुरू असून येत्या काही दिवसात पूर्णत्वाकडे येईल. त्यानंतर गोशाळा गायींसाठी खुली केली जाणार आहे. देशी गायींच्या संगोपनासाठी ही गोशाळा उभारली जात आहे.
– डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते)