सहा जण जखमी, ग्रामस्थांतून संताप : गावात तणावाचे वातावरण : ग्रामस्थांना शांततेचे आवाहन
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
गौंडवाड येथील सर्वे नं. 78 व 88 या देवस्थान जमिनीमध्ये रविवारी देवस्की पंच व ग्रामस्थ मिळून पेरणी करत असतेवेळी किसन अशोक पाटील, अशोक केदारी पाटील, भरत केदारी पाटील, परशराम नागो पाटील, प्रेमा अशोक पाटीलसह इतर सहकाऱयांनी ग्रामस्थ अनिल भैरू पाटील व शंकर गुरुनाथ निलजकर यांच्यावर खुनी हल्ला केला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व्हे नं. 78 व 88 ही गावची देवस्थानची जमीन असल्यामुळे ग्रामस्थ रविवारी सदर जमिनीमध्ये पेरणी करत होते. याची माहिती किसन अशोक पाटील कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आपल्या जमिनीमध्ये पेरणी करत असल्याचे पाहून दोघांवर खुनी हल्ला केला. हल्ल्यानंतर ते पळून गेले. त्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी अशोक केदारी पाटील, भरत केदारी पाटील, मारुती नारायण पाटील आदींच्या घरावर हल्ला करून आपला संताप व्यक्त केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमदारांकडून शांततेचे आवाहन
30 नोव्हेंबर 2020 रोजी याच जमिनीच्या वादातून वरील मारेकऱयांनी ग्रामस्थ सतीश राजेंद्र पाटील यांच्यावरही हल्ला केला होता. त्यावेळी देखील ग्रामस्थांनी आरोपींना चांगला धडा शिकविला होता.
त्यावेळी यमकनमर्डी मतदार क्षेत्राचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी सामंज्यसपणाची भूमिका घेतली होती. परंतु, रविवारी पुन्हा देवस्थान जमिनीचा वाद उफाळून आल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. देवस्थानची जमीन परत मिळविण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे गावची एकी विरोधकांना भारी पडल्याचेही चित्र दिसून येत आहे. तेव्हा संबंधित लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱयांनी त्वरित लक्ष देऊन गावच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याची एकमुखी मागणी करण्यात येत आहे. घटनास्थळी काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूरसह व सहकाऱयांनी भेट देऊन वातावरण शांत केले. घटनेची नोंद काकती पोलिसांत झाली आहे.
16 जणांविरूद्ध एफआयआर दाखल
देवस्की जमिनीच्या वादातून गौंडवाड (ता. बेळगाव) येथे रविवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाले. यावेळी काही घरांवर हल्ले करण्यात आले असून वाहने पेटविल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हाणामारीत दोन्ही गटातील सहाजण जखमी झाले आहेत. परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांचे सहकारी रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवारी पहाटेपर्यंत गौंडवाड येथे तळ ठोकून होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परस्परांविरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून एकूण 16 जणांविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. अशोक केदारी (वय 50), किसन पाटील (वय 30), कृष्णा पाटील (वय 35), उमेश पाटील (वय 42), अनिल पाटील (वय 48), शंकर निलजकर (वय 55) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सरकारी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत. हाणामारीच्या घटनेनंतर गावात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.